अमरावती, दि. 29 : जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत बुधवार, दि. 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार आहे. या दिवशी 1 ते 19 वर्षातील मुलांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 5 लाख 19 हजार 239 लाभार्थ्यांना बुधवारी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिन दि. 4 डिसेंबर आणि मॉप अप दिन दि. 10 डिसेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. यात 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलीना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविला जाणार आहे. या मोहिमेत 1 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना अर्धा गोळीची मात्रा पावडर करून दिली जाणार आहे, तर 2 ते 19 वर्षे वयोगटातील सर्वांना एक गोळी चावून खावी लागणार आहे. ही मोहिम सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अंगणवाडी, शाळाबाह्य मुलांमध्ये राबविण्यात येणार आहे.
या गोळीचा फायदा रक्ताशय अॅनिमिया कमी होतो, शाळेतील उपस्थिती नियमित होते, बालक क्रियाशील बनते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शारीरिक व बौद्धीक वाढ सुधारते, आरोग्य चांगले राहते, अल्बेंडेझोलच्या एका डोसमुळे जंताचा नाश होतो. या गोळीचा दुष्परिणाम नाही, ही गोळी प्रत्यक्ष खाऊ घालायची आहे. ती घरी घेऊन जाता येणार नाही. शाळाबाह्य मुलांना आशा स्वयंसेविकेमार्फत गोळीचे वाटप करण्यात येणार आहे. पालक, शिक्षक, संस्थानी मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे.