चांदुररेल्वे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा नवा उपक्रम : | काटेरी झुडपांजवळ बीजारोपण व वृक्षारोपण |

0
86
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

• चांदुर-रेल्वे : दि. १६ (प्रति)

विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी, अमरावती द्वारा संचालित येथील महिला कला-वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल व पर्यावरण विभागाच्यावतीने पोहरा परिक्षेत्रातील काटेरी झुडपांच्या सान्निध्यात वृक्षांचे बीजारोपण आणि वृक्षारोपण नुकतेच करण्यात आले.

भूगोल विभाग प्रमुख प्रा. संजीव भुयार यांनी या उपक्रमाचा हेतु विद्यार्थिनींना समजावून सांगितला. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले की, बदलत्या पर्यावरणात प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. काटेरी झुडपे रानावनात, पडीक जमिनीवर, नदी-नाल्यांच्या काठावर आणि रस्त्यांच्या दुतर्फा निसर्गतः उगवतात. त्या झुडपांजवळ कडुनिंब, चिंच, आंबा, कवठ, बेल, जांभूळ यांसारख्या वृक्षांचे बीजारोपण केल्यास त्या वृक्षांची वाढ चांगली होते. ते वृक्ष हमखास जगतात. ही बाब लक्षात घेऊन भूगोल व पर्यावरण विभागाच्यावतीने काटेरी झुडपांजवळ बिजारोपण व वृक्षारोपण हा कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला.

काटेरी झुडपांजवळ बीजारोपण केल्यास किंवा वृक्षारोपण केल्यास त्या वृक्षांचे जनावरांपासून आपोआप संरक्षण होते. त्यामुळे झाडाच्या संरक्षणावर वेगळा खर्च करण्याची गरज उरत नाही. काटेरी झुडपे किंवा पळस वृक्ष हे उन्हाळ्यात हिरवेगार असतात. त्यांच्यात‌ पाणी धरून ठेवण्याची भरपूर क्षमता असते. परिणामी, उन्हाळ्यातही ही झाडे आपल्या जवळच्या झाडांना ओलावा देतात. तसेच ते उन्हापासून झाडांचे संरक्षणही करतात. या झाडांच्या मुळाशी रायबोझियम जिवाणू तयार होऊन हे जिवाणू हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. यातून झाडांना नैसर्गिकरीत्या नत्र खनिज मिळत असल्याने त्यांना वेगळ्या खतांची आवश्यकता नसते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ह्या सर्व गोष्टींचा विचार करून महिला महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या विद्यार्थिनींनी कडुनिंबाच्या निंबोळ्या, जांभूळबिया, कवठाच्या बिया, बेलाच्या बिया आणि गावरानी आंब्याच्या कोयी गोळा करून त्यांची जंगलात, रस्त्याच्या दुतर्फा, नदीनाल्यांच्या काठावर असलेल्या काटेरी झुडु्पांजवळ खड्डा खोदून त्यात वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम उत्स्फूर्तपणे हाती घेतला. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी घरी पॉलिथिन बॅगमध्ये कडुनिंब, आंबा, उंबर, पिंपळ, बेल या वृक्षांची रोपे तयार केली. या रोपांची लागवड या उपक्रमातून करण्यात आली.

या उपक्रमात प्रा. रश्मी खेडकर, निकेत मोहोड, सोनाली कातोरे, अनामिका मडावी, ऋतिका इंगळे, प्रतिक्षा नेवारे, हर्षा बावनथडे, सीमा बावनथडे, अनुष्का गुल्हाने, भावना मेश्राम, मोनीका लाकडे, आकांक्षा दखने, रजनी पाटील, वैष्णवी श्रीराव, कल्याणी श्रीवास, हर्षदा मसराम, राजश्री पांडे, चंचल संसारे, मनिषा उके, आचल नन्नावरे सहभागी झाले होते.

veer nayak

Google Ad