सलील स. काळे✍️
धामणगाव रेल्वे, दि. १७ :
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लुनावत नगर भाग १, भाग २, भाग ३, सर्वोदय कॉलनी तसेच परिसरातील अनेक भागांमध्ये रविवारी पहाटे ३ वाजून १८ मिनिटांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अक्षरशः रात्रभर त्रास सहन करावा लागला. उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना नागरिकांनी रात्र जागून काढली असून महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे…
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री वीज गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. मात्र संबंधित जेई, Dy. EE तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “अधिकाऱ्यांच्या घरची वीज व्यवस्था स्वतंत्र असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या त्रासाची जाणीव होत नाही का?” असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला…
दरम्यान, सकाळी उशिरा वीज पुरवठा सुरू करण्यात आला असला तरी समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. सध्या परिसरात सतत वीज ‘ये-जा’ होत असून साधारण एक तास वीज राहते आणि पुन्हा दहा ते पंधरा मिनिटांसाठी पुरवठा खंडित होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. या लपंडावामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः फ्रिज, कुलर, एसी, टीव्ही आणि इन्व्हर्टर यांच्यावर परिणाम होत असल्याने नागरिक चिंतेत आहेत…
अमरावती जिल्ह्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून अशा भीषण उकाड्यात रात्रभर वीज नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागला. पाण्याच्या मोटारी बंद राहिल्याने अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे समोर आले आहे…
नागरिकांनी महावितरणच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करताना, “वीज बिल थकल्यास तत्काळ लाईन कापली जाते, मात्र जनतेला तासन्तास अंधारात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होते?” असा प्रश्न उपस्थित केला आहे…
वीज नियामक आयोगाच्या नियमांनुसार, दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित राहिल्यास आणि तक्रारींवर वेळेत प्रतिसाद न दिल्यास ग्राहकांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना त्याचा लाभ मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे…
या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, परिसरातील वीज पुरवठा तातडीने स्थिर करावा तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे…️








