त्याने महिलांना कशा पद्धतीने भुलवले, त्यांना भीती घातली आणि कधी कधी धमकावून अत्याचार केले. याच खरातने बोगस चमत्कार दाखवून बोगस रत्ने आणि चिंचोकेही लाखोंना विकले. याबद्दलच्या चर्चा आता या गावात रंगल्या असून आणि पोलिसांच्या चौकशीतूनही धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात हा मंदिर परिसरात नकली साप व वाघाचे कातडे ठेवून लोकांमध्ये भीती व प्रभाव निर्माण करत असे. याद्वारे अघोरी विधी करून संमोहनविद्येद्वारे त्याने लोकांकडून पैसे उकळल्याचे पुढे आले आहे. हा साप (काहींनी सांगितल्यानुसार हा कोब्रा नाग होता) जिवंत सापासारखाच हुबेहुब होता. रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून त्याची हालचाल होत असल्याने लोकांचा विश्वास बसून बाबाचा चमत्कार वाटायचा.
त्याच प्रमाणे १०० रुपये किलो भावाने बाजारात मिळणारे रानटी चिचोक्यांना पॉलिश करून आणि मढवून अशोक खरात हा भाबड्या भाविकांना प्रती नग तब्बल १० हजार ते एक लाख रुपयांना विकायचा. असाच प्रकार तो नकली खडे व रत्ने असली म्हणून विकताना करायचा असेही तक्रारीत म्हटले आहे. विकृत अशोक खरात याचे कारनामे त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कॅमेऱ्यात शूट केले. त्याच्या कार्यालयातच त्याने स्पाय कॅम बसवले आणि खरातचे विकृत चाळे कैद केल्याचे आता पुढे येत आहे. हा प्रकार कळल्यानंतर खरात याने त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. “हे बाहेर सांगितले तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी खरातने त्याला दिली होती. हा कर्मचारी २०१९ पासून खरात याच्याकडे काम करीत होता. कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात खरात नसताना सायंकाळी मित्राला बोलावून त्याने छुपा कॅमेरा बसवला होता. त्यानंतर अनैतिक, अघोरी प्रकार होतात का याची खात्री करण्यासाठी चित्रण तपासले असता तो हादरला. हा सगळा प्रकार समजल्यानंतर त्याने चित्रीत झालेले सर्व व्हिडिओ ताब्यात घेतले होते.











