मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत पिंपळखुटा येथे रविवारी (दि. ८ मार्च २०२६) सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि सक्षमीकरणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती गीताताई गुल्हाणे या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सविता अप्तुरकर (स्त्री रोग तज्ञ) यांनी महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. मेघा सावळकर तसेच मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनच्या एएसआय शीलाताई सूर्यवंशी उपस्थित होत्या.
यावेळी एएसआय शीलाताई सूर्यवंशी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल अर्चना बोईनवाड, आचल मेठे, ज्योती ठावकर व वंदना जवादे यांनीही महिलांना कायदेविषयक माहिती देत महिलांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला माजी सरपंच दिलीप राऊत, माजी उपसरपंच पद्माताई मेश्राम, पोलीस पाटील शारदाताई गायके यांच्यासह माजी ग्रामपंचायत सदस्या आशाताई रुद्रकार, कुसुमताई टांगले, जयश्रीताई बेदुरकर (आशा सेविका), कमलाताई रघोर्ते (आशा सेविका), सिंधुताई चोले, सुरेखाताई गाढवे, सूर्यकांता धांडे (अंगणवाडी सेविका) तसेच शालिनीताई हारगोडे, सरलाबाई डेरे, योगिताताई नाखले (अंगणवाडी मदतनीस) यांची उपस्थिती होती. गावातील महिला भगिनी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी कु. पल्लवी रंगारी यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले तसेच अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. गावातील महिलांनी या कार्यक्रमाचे छान नियोजन केल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी कुमारी पल्लवी रंगारी यांचे विशेष कौतुक केले
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या सन्मानाचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.












