धामणगाव रेल्वे
धामणगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.शरदकुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. रमेशचंद्र चांडक, सचिव ॲड. आशिष राठी, सहसचिव डॉ. असित पसारी, कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर पसारी, शाळेचे संचालक राजेंद्र जोशी, प्राचार्य रवी देशमुख तसेच उपप्राचार्या साई नीरजा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्राचार्य रवी देशमुख यांनी केले. तर विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. परीक्षेविषयी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सहसचिव डॉ.असित पसारी यांनी आपल्या विशेष भाषणात विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य व सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारावा, असे आवाहन केले. दहावीच्या टप्प्यानंतर करिअरची निवड करताना केवळ स्वतःची आवडच नव्हे तर समाजाची गरजही लक्षात घ्यावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. तर शाळेचे संचालक शाळेचे संचालक राजेंद्र जोशी यांनी आपल्या भाषणात विद्यानिकेतन शाळेच्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीवर प्रकाश टाकला. व विद्यार्थ्यांनो स्वयंप्रकाशित व्हावे असा संदेश दिला. तर शिक्षकांचे योगदान व विद्यार्थ्यांनी मिळवलेली शैक्षणिक गुणवत्ता ही शाळेची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.विद्यार्थ्यांनी भविष्यात जबाबदार नागरिक बनून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा आपल्या भाषणात सागर ठाकरे व रंजुश्री शेंडे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकारी वर्गमित्रांसोबतचा प्रवास भावनिक शब्दांत मांडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नीलिमा राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन शुभम मिश्रा यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला.

















