धामणगाव रेल्वे : तालुका प्रतिनिधी
शारीरिक अडचणी कधीही यशाच्या मार्गातील अडथळा ठरू शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित से. फ. ला. हायस्कूल, धामणगाव रेल्वे येथील दिव्यांग विद्यार्थी तन्मय मडावी याने.
दिनांक १६ व १७ डिसेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, धामणगाव रेल्वे येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग गटातून (इयत्ता 12 वा विज्ञान) शाखेतील तन्मय मडावी याने “बायवाइप सिस्टीम” ही नाविन्यपूर्ण विज्ञान प्रतिकृती सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. अनेक शारीरिक अडचणी असूनही तन्मयने जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले असून ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी आणि भावस्पर्शी ठरली.
तसेच या प्रदर्शनात इयत्ता नववी ते बारावी गटातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. माही गोतमारे (वर्ग 10 F) व भावेश ढोके (वर्ग 10 D) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
याचप्रमाणे इयत्ता पाचवी ते आठवी गटातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. दिया राठी (वर्ग 8 F) व आर्यन गावंडे (वर्ग 8 F) यांनीही प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक विज्ञान शिक्षक राम बावस्कर व सचिन कुर्लेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या घवघवीत यशाबद्दल मुख्याध्यापक प्रशांत शेंडे, उपमुख्याध्यापक अनिल लाहोटी, पर्यवेक्षक प्रमोद हातेकर तसेच सर्व विज्ञान शिक्षकवृंद व विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत…















