आदर्श ग्राम वाढोणा येथे वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

0
22
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे 

वाढोणा – “काटे गोटे वेचूनी फुले देणं” हा केवळ संतांचा अभंग नाही, तर तो जगण्याचा मार्ग आहे, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे त्र्यंबकराव गुलाबराव गायकवाड. वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांच्या स्वच्छतेच्या कार्यावर पाऊल ठेवत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामविचारांची कास धरत, गेल्या 30 वर्षांपासून ते निष्काम भावनेने ग्रामसेवेचा अखंड यज्ञ करत आहेत.

गाडगे महाराजांनी समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला. स्वच्छता म्हणजे केवळ झाडू मारणे नाही, तर ती मनाची, विचारांची आणि जीवनशैलीची शुद्धता आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून शिकवले. त्याच विचारांची ज्योत आज वाढोणा गावात त्र्यंबकराव गायकवाड आपल्या श्रमातून अखंड चालू ठेवत आहेत.कुठलाही मोबदला न घेता, कोणतीही प्रसिद्धी न मागता, वर्षभरही एकही दिवस न चुकवता सकाळी ४ ते ७ या वेळेत ते गावातील रस्ते, चौक, नाले व गटारे स्वच्छ करतात. संपूर्ण गावाची त्यांनी सप्तानुसार विभागणी करून दर आठवड्याला एक चौक पूर्णपणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. हा उपक्रम केवळ श्रमाचा नाही, तर तो शिस्त, सातत्य आणि समाजप्रबोधनाचा आदर्श आहे.ग्रामस्वच्छतेबरोबरच त्यांच्या सेवेला आध्यात्मिक अधिष्ठान आहे. श्रावण महिन्यात ते प्रत्येक घराघरात २१ बेलाची पाने व फुले मोफत देतात. काटे वेचून फुले देण्याचा हा भाव, त्यांच्या जीवनदृष्टीचे प्रतीक आहे.

“गाव हेच आपले घर” ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण त्यांनी आत्मसात केली असून,

“नाम निष्काम, कर्म अविरत – ग्रामसेवेतूनच स्वर्ग गावा” या भावनेतून ते काम करतात.त्र्यंबकराव गुलाबराव गायकवाड हे अतिशय साध्या कुटुंबातील व्यक्ती आहेत. अल्पभूधारक शेतकरी म्हणून ते फुलांची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तब्बल २५ वर्षे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एका छोट्याशा खोलीत संसार केला. अलीकडे घरकुल योजनेतून तीन खोल्यांचे घर मिळाले असले तरी त्यांच्या जीवनातील साधेपणा, विनम्रता आणि सेवेचा भाव अजूनही तसाच आहे.

गेल्या 30 वर्षांपासून ते गाडगे महाराजांच्या स्वच्छता विचारांवर चालत आणि तुकडोजी महाराजांच्या ग्रामविकासाच्या तत्त्वांना आचरणात आणत, श्रम, सहकार्य, समर्पण आणि सेवाभाव यांचा संगम असलेले कार्य करत आहेत. आजच्या काळात, जिथे प्रत्येक गोष्टीला मोबदल्याची अपेक्षा असते, तिथे त्र्यंबकराव गायकवाड यांची सेवा ही निष्काम कर्मयोगाची जिवंत उदाहरण आहे.

त्यांचे हे कार्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून, समाजाला दिशा देणारे आहे.

तर शनिवार दिनांक 20 डिसेंबर ला वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्याने वाढोणा गावातून रामधून काढण्यात आली, त्यामध्ये गावातील सर्व महिला व पुरुष भजन मंडळी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, तसेच भजन मंडळ मध्ये नवनाथ तिहले महाराज व सुरज तिहले महाराज, यांच्या डफडीचा नादावर भजने त्यांनी म्हटली त्यांचे असे सहकार्य लाभले, तसेच ग्रामगिताचार्य हनुमंत ठाकरे दादा यांनी आपल्या वाणीतून वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा यांचे कार्य विचारांचे समाज प्रभोधन केले प्रत्येक चौका चौकात रामधूनमध्ये , व सर्व गाव रामधून झाल्यावर श्री संत गजानन महाराज देवस्थान येथे संत गाडगेबाबा यांचा फेरीचा समारोप झाला व यावर्षीचा वैराग्य मूर्ती संतगाडगेबाबा सेवा प्रति पुरस्कार गावामध्ये उत्कृष्ट सेवा करण्याऱ्या श्रीमती गंगाबाई रामूजी लांमकाशे वय 90 वर्ष यांना सेवा प्रति पुरस्कार प्रदान करण्यात आला, यामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वाढोणा येथील मुख्याध्यापिका माधवी ढाकळे व सर्व शिक्षिका सर्व विद्यार्थी उपस्थित होते. व चांगला सहभाग त्यांनी दर्शवीला,व तसेच उपस्थित गावातील पोलीस पाटील रूपेश तितरे, पत्रकार गजानन फिरके, उपसरपंच विजय पाटील, माजी सरपंच मुरलीधर नारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश गुडधे,माजी ग्रामपंचायत सदस्य राजु तितरे, धनराज धोपटे, सुनील काळे ,व सर्व वाढोणा ग्रामवासियांच्या सहकार्याने व उपस्थितीने हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला.

veer nayak

Google Ad