नादुरुस्त रस्ते व एसटी बसांचा अभाव; प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात भाविकांचा आणि ग्रामस्थांचा संताप
चांदूर रेल्वे :- “चला जाऊ सावंगपुरी, गडे हो भक्तांचे माहेरी… तिथे नांदतो हरी, हेच होय पुंण्याची पायरी!”
या भक्तिरसपूर्ण ओवीच्या गजरात यंदा मार्गशीर्ष अमावास्येनिमित्त श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत पारंपरिक ‘चंदनउटी’ उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे.
श्री विठोबा संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता विधीपूर्वक चंदनउटी उत्सवाची सुरुवात होणार आहे. अवधूत परंपरेतील भजनगायनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.
सावंगपूर नगरी ही भाविकांचे माहेर मानली जाते. त्यामुळे परिसरासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सोयीसाठी सायंकाळी ६.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी संस्थानच्या महाप्रसाद नियोजन समितीने व्यापक तयारी केली आहे.
संस्थानच्या वतीने सर्व भाविकांना या पवित्र सोहळ्यात तन-मन-धनाने सहभागी होऊन भक्तीचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भक्तनिवासाचा मोठा निर्णय
भाविकांच्या निवासाच्या दृष्टीने संस्थानने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, धर्मशाळेसह सर्व सुविधा असलेले पाच मजली ‘भक्तनिवास’ बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली. यामुळे भविष्यात यात्रेकरूंची निवासाची मोठी अडचण दूर होणार आहे.
रस्ते व एसटीचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, सावंगपूर नगरीत येण्यासाठी भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सावंगा विठोबा ला पोहचविणारे सर्वच रस्ते नादुरुस्त असून मालखेड येथील रेल्वे अंडरब्रिज चा रस्ता तर जीवघेणा असल्याचे भाविकांचे मत आहे. आणि एसटी बससेवेचा अभाव यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे विभागीय नियंत्रकांनी अमरावती आगार प्रमुखांना एसटी बस सुरू करण्याबाबत पत्र दिले असतानाही अद्याप बससेवा सुरू झालेली नाही.
या प्रशासनिक उदासीनतेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास श्री विठोबा संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या धार्मिक कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर व स्वप्नील चौधरी यांनी भाविक व ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहन केले आहे.









