चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
चांदूर रेल्वे येथील होमगार्ड पथकाचा ६९ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने चांदूर रेल्वे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने व केंद्रनायक दीपक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला.
वर्धापन दिनानिमित्त होमगार्ड पथकाने साप्ताहिक परेड घेतली तसेच चांदूर रेल्वे शहरात पुरुष व महिला होमगार्ड सैनिकांची पायदळ रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे होमगार्ड संघटनेच्या कार्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी तालुका समादेशक अधिकारी चंद्रकांत पवार यांनी उपस्थित पुरुष व महिला होमगार्ड सैनिकांना मार्गदर्शन करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रॅलीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पथकातील सुभाष घोडेस्वार यांनी समारोप केला. तसेच सैनिक मुरायते, टेवरे, सोनवणे, तांडेकर, अग्रवाल, गोगटे, काळबांडे यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.













