उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान
अमरावती, दि. 28 : पात्र नागरिकांना आरोग्याची सुविधा देण्यासाठी गोल्डन कार्ड देण्यात येत आहे. सदर कार्ड काढण्याची जबाबदारी आशा सेविकांवर देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड महत्वाचे असल्याने डिसेंबर महिन्यात गोल्डन कार्डसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गोल्डन कार्ड नोंदणीसंबंधी बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, आयुष्मानच्या जिल्हा समन्वयक डॉ. अंकिता मटाले यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, आशा सेविकांना आता नवीन कार्ड नोंदणीसाठी 20 रूपये तर वितरणासाठी 10 रूपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे आशा सेविकांनी यात सक्रीय सहभाग नोंदवावा. यासाठी येत्या दोन दिवसांत आशा सेविकांचे लॉगइन आयडी सक्रीय करावे. कार्डची नोंदणी होण्यासाठी मोहिम राबवावी लागणार आहे. यासाठी संपूर्ण डिसेंबर महिन्यात या नोंदणीवर लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. नोंदणीचे काम गतीने होण्यासाठी आशांना लाभार्थ्यांच्या याद्या पुरविण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने डिसेंबर महिन्यात मोहिम घेण्यात येणार आहे. या योजनेत रूग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यातील 51 रूग्णालये अंगीकृत असून नि:शुल्क उपचार करण्यात येतात. यासाठी नोंदणीला गती देण्यात येणार आहे. शिधा पत्रिकेवर या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे शिधापत्रिकेत नाव नसल्यास शिधापत्रिका अद्ययावत करावी. त्यानंतर 60 दिवसात लाभार्थ्यांचे नाव यादीत येणार आहे.
यावेळी नोंदणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविका निता खंदेझोड, वर्षा आडोळे, मुक्ता वानखेडे, गुंफा खडसे, वनिता पंचाळे, जयश्री देवळे, पंची दहिकर, काजल साम्बरकर, सिमा सोनोने, गिता गावंडे, इंदिरा मोहोड, कल्पना मेश्राम, शेषकन्या थोरात, सुनिता चौरकर यांचा जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.














