जुना धामणगाव (शहापूर) येथे अंत्यसंस्कार; भक्तांचा जनसागर
धामणगाव रेल्वे (ता. २७):
विदर्भातील लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेले ब्रह्मचारी मनोज बाबा उर्फ मनोज उकंडरावर कैकाडी (वय ५१) यांचे दुर्दैवी निधन रविवारी (दि. २६ ऑक्टोबर) सायंकाळी अपघातात झाले. म्हैस आडवी आल्याने मोटारसायकल घसरून ते खाली पडले. पूलगाव येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मूळचे जुना धामणगाव (शहापूर) येथील रहिवासी असलेले मनोज महाराज यांचा तळेगाव भारी (जि. यवतमाळ) येथे आश्रम असून विदर्भभर त्यांचे असंख्य भक्त आहेत. मागील काही दिवसांपासून ते गावात मुक्कामी होते. रविवारी सकाळी आजनसरा येथे दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात वर्धा जिल्ह्यातील पिंपरी येथे हा अपघात घडला.
मनोज महाराजांच्या निधनाची बातमी समजताच विदर्भातील भक्तांवर शोककळा पसरली. सोमवारी जुना धामणगाव येथून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावासह आसपासच्या जिल्ह्यांतील हजारो भक्तांनी उपस्थित राहून महाराजांना श्रद्धांजली वाहिली.
त्यांच्या मागे आई-वडील व मोठा भक्त परिवार आहे. मनोज महाराजांचे आध्यात्मिक कार्य, भक्तीभाव आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले होते.













