जिल्ह्याला ‘मनरेगा’चा 15 कोटी 28 लाखांचा निधी. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मजुरांना दिलासा

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 21 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) जिल्ह्याला 15 कोटी 28 लाख रुपयांचा निधी दोन टप्प्यात प्राप्त झाला आहे. सदर निधी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला आहे. कामांची मजुरी थकीत असल्याने याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे सुमारे 63 हजार मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात सध्या 4 हजार 843 कामांवर 62 हजार 983 मजूर कार्यरत आहे. निधीच्या कमतरतेमुळे मजुरांना अडचणींचा सामना करावा लागला. मनरेगाची अनेक कामे थांबली होती. आता हा निधी उपलब्ध झाल्याने कामे पुन्हा सुरू होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
उपलब्ध निधीपैकी अचलपूर 57 लाख 43 हजार, अमरावती 83 लाख 57 हजार, अंजनगाव सुर्जी 42 लाख 68 हजार, भातकुली 61 लाख 11 हजार, चांदूर रेल्वे 67 लाख 25 हजार, चांदूर बाजार 1 कोटी 23 लाख 22 हजार, दर्यापूर 69 लाख 33 हजार, धामणगाव 91 लाख, धारणी 24 लाख 93 हजार, मोर्शी 6 कोटी 21 लाख 71 हजार, नांदगाव खंडेश्वर 89 लाख 49 हजार, तिवसा 90 लाख 77 हजार, वरुड 1 कोटी 6 लाख 88 हजार रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. चिखलदरा तालुक्याला याआधीच निधी वितरीत करण्यात आला आहे.
मनरेगाचा निधी मिळालेला नसल्याने मजूरांअभावी असंख्य कामांना विलंब होत होता. तसेच मजुरांची अडचणी होत होती. तीन ते चार महिन्यांपासून मजुरी प्रलंबित असल्याने मजुरी मिळण्यासाठी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्याकडे विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या निर्देशाने जिल्हाधिकारी यांनी शासनाला थकीत निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला. निधी मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केल्याने जिल्ह्याला 15 कोटी 28 लाख रूपयांचा निधी 8 मे आणि 19 मे रोजी प्राप्त झाला आहे. सदर रक्कम मजुरांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. जिल्ह्याने आतापर्यंत एकूण 28 कोटी 62 लाख रूपयांची मागणी केली आहे. उर्वरीत 13 कोटी 34 लाख रूपयांचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे रोहयो उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी कळविले आहे.
00000
जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद, हिंसाचारविरोधी दिनाची शपथ
अमरावती, दि. 21 (जिमाका) : दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांनी शपथ घेतली.
निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त शपथ दिली. यावेळी तहसिलदार विजय लोखंडे, निलेश खटके, तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 21 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता अकरावी व बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक व अवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल. परंतु 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. योजनेचे निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना hmas.mahait.org वर उपलब्ध आहे.
वरिल संकेतस्थळावरून काही विद्यार्थ्यांनी अर्ज डाऊनलोड करून अर्जासोबत जोडलेल्या आवश्यक कागदपत्राच्या यादीसह सहायक आयुक्त समाज कल्याण अमरावती कार्यालयामध्ये जमा केलेले नाही. एकुण 1 हजार 476 विद्यार्थ्यांनी अपूर्ण अर्ज सादर केल्यामुळे त्यांचे अर्ज पोर्टलवर प्रलंबित असून याबाबत विद्यार्थ्यांना पोर्टवर सेंट बॅक करून ऑनलाईन पोर्टवर अर्जामध्ये नमूद भ्रमणध्वनी तसेच ईमेलव्दारे कळविण्यात आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्जातील त्रुटी पुर्तता केलेली नाही, त्यांनी त्रुटीची पुर्तता बातमी प्रसिध्द झाल्यापासून दोन दिवसाच्या आत करण्यात यावी. याबाबत विलंब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील. विद्यार्थ्यांनी त्रुटीची पुर्तता करून आवश्यक कागदपत्र कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावा.
अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती चांदुर रेल्वे रोड, सी. पी. ऑफीसच्या मागे अमरावती तसेच speldswo_amtrediffmail.com व दुरध्वनी क्रमांक 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.
000000
पारधी समाजासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 26 जून
अमरावती, दि. 21 (जिमाका) : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी कार्यक्षेत्रांतर्गत पारधी पॅकेज योजना सन 2024-25 अंतर्गत मंजूर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून योजनेचे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 26 जून 2025 आहे.
वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज धारणी, चिखलदर, अंजनगाव व अचलपूर, तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय, धारणी जि. अमरावती या ठिकाणी व नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती येथे तसेच मोर्शी, वरूड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत उप कार्यालय मोर्शी येथे विहित नमुन्यात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 07226-224217 या क्रमांकावर संपर्क साधावा. योजनेचा अर्ज भरतांना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती अर्जाच्या नमुन्यावर नोंदविण्यात आली आहे.
वैयक्तिक लाभाच्या योजना
पारधी विकास कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश आहे. यामध्ये पारधी समाजाच्या बचत गटांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, लाभार्थ्यांना शेळी गट खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, लाभार्थ्यांना ऑटो रिक्षा पुरविणे या योजनांचा समावेश आहे.
वरील योजनेसाठी शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या अर्जाच्या जेष्ठतेनुसार संगणकीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करून पात्र व अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करताना प्रथम दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अपंग, वीरपत्नी, परितक्ता, निराधार, महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी दिली आहे.
0000

veer nayak

Google Ad