धामणगाव रेल्वे – तालुक्यातील वर्धा नदीपात्रातून होत असलेल्या अवैध रेती उत्खननावर महसूल विभागाने मोठीं करवाई करून एक पोकलॅंड सह लाखोंचा रेतीसाठा जप्त केला आहे.जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशाने गुरुवारी ता.९ सायंकाळी चांदुर उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात महसूल विभागाने सदर कारवाई केली आहे.
महसूल व खनिकर्म विभागाच्या पथकाने गुरुवारी तालुक्यातील वर्धा नदीपात्रालगत असलेल्या सलाबदपूर व सोनोरा काकडे परिसरात आकस्मिक धाड घालून महसूल विभागाने संयुक्त कारवाई केली.

उपविभागीय अधिकारी श्रद्धा उदावंत व जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांच्या उपस्थितीत मौजा सलाबादपूर येथील सर्व्हे नं. ८/३ मध्ये तपासणी करण्यात आली. यावेळी घटनास्थळी नंबर प्लेट नसलेली एक पोकलॅंड मशीन तसेच एम एच ४० सीडी-७९३५ क्रमांकाचा डिझेल टँकर आढळून आला. यावेळी घटनास्थळी २५० ब्रास इतका रेतीसाठा अवैधरित्या साठवलेला असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून संबंधित रेतीसाठा जप्त केला असून तो ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी आढळलेली बोटी, सक्शन पंप व इतर साहित्य नष्ट करण्यात आले.
कारवाईदरम्यान नायब तहसीलदार ऋतुराज पटोरकर व देवेंद्र वासनिक, मंडळ अधिकारी राजेश लाड, व्यंकटी कांबळे तसेच तलाठी आकाश चव्हाण, विनोद जायभाये, अनिल धुळे, बिपीन काळे, रितेश भाकरे, गौरव श्रीराव, शैलेश ढोरे, अनंता मानकर यांच्यासह पोलीस पाटील आदित्य मानकर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे श्रद्धा उदावंत यांनी जप्त करण्यात आलेल्या रेतीसाठ्याचा गौण खनिज नियमांनुसार जाहीर लिलाव करून त्यातून मिळणारा महसूल शासकीय तिजोरीत जमा करण्याच्या सूचना तहसीलदार अभय घोरपडे यांना दिल्या आहेत.या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाकडून अशा कारवाया पुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

















