प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकरी गटाला जोडणार – जिल्हाधिकारी आशिष येरेकर
कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांचा गौरव
अमरावती, दि. 7 (जिमाका) : शेतीची उत्पादकता वाढवून उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होणे गरजेचे आहे. राज्यभरात शेतीमध्ये होत असलेले विविध प्रयोग आणि त्यातून वाढलेली उत्पादकता याचा जिल्ह्यात प्रसार होणे आवश्यक आहे. यासाठी महिला बचत गटाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांना जोडण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत उत्पादकता वाढीसाठी कार्यशाळा आणि शेतकऱ्यांचा गौरव कार्यक्रम आज नियोजन भवनात घेण्यात आला. यावेळी कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, रेशिम उपसंचालक महेंद्र ढवळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची पूर्ण जबाबदारी कृषी विभागावर आहे. आज शेतीवर 50 टक्के लोकसंख्या अवलंबून असताना केवळ 15 टक्के शेतीतून उत्पादन होत आहे. हे उत्पादन वाढीसाठी विविध तंत्रज्ञान आणि प्रयोग करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून त्यानुसार पिक निवडणे गरजेचे आहे. शेतीचा लागवड खर्च वाढत असताना आर्द्रता पाहून फवारणी केल्यास 30 टक्के औषधांची बचत होत असल्याने या तंत्राचा उपयोग होणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात संत्रा फळपिकाखाली मोठे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांच्या स्तरावर फळांचे वर्गीकरण होत असले तरी आता फळांपासून पल्प काढण्याचे तंत्र शेतकऱ्यांनी शिकावे लागणार आहे. यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. कृषी हा प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे जमीन, पिक आणि अनुषंगीक बाबींचा बारकाईने विचार करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. कृषी विभागाच्या व्हॉटस्ॲप ग्रुपच्या माध्यमातून दैनंदिन माहिती देण्यात येते. त्याचबरोबर शेतकरी गटाशी प्रत्येक शेतकऱ्यांला जोडून तालुका, गावस्तरावर माहिती पोहोचविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जोडण्याचे काम येत्या काळात हाती घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विभागाने स्वयंप्ररणेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे अमित कुकडे, गौतम गेडाम, राजाभाऊ तिडके, सुभाष तायडे, प्रवीण वैद्य, परशराम भिलावेकर, श्रावण धुर्वे, तोताराम भिलावेकर, स्वप्निल फुंडकर, ओंकार चव्हाण, गजानन गोजरे, संजय सरदार, विनय बोथरा, देविदास ढोके, राहुल निमकर, तुषार माकोडे, शैलेंद्र देशमुख, रूपाली ठाकरे, अतुल खरबडे, प्रफुल सांबरतोडे, सुखराम धुर्वे, सुशील काकडे, ललिता महाजन, निलेश कुरवाडे, अभिषेक आसोले, सहायक कृषी अधिकारी सतीश निमकर, सुनील हर्ले, विनोद बोंडे, ज्योती ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विनय बोथरा यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अहिल्यानगर येथील राहुल रसाळ यांनी आधुनिक शेती पद्धतीबाबत दूरदृष्यप्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नवीन पिक विमा योनजेच्या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. श्री. सातपुते यांनी प्रास्ताविक केले.
निवृत्तीवेतन नियमित चालू राहिल. कोषागार कार्यालयाचे स्पष्टीकरण
अमरावती, दि. 07 (जिमाका) : निवृत्ती वेतन फॉर्म सादर केला नसल्यास निवृत्तीवेतन बंद होणार आहे, अशी अफवा समाजमाध्यमातून पसरविण्यात येत आहे. यात कोणतेही तथ्य नसून निवृत्तीवेतन नियमित सुरू राहणार आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा कोषागार कार्यालयाने दिले आहे.
व्हॉट्स ॲप आणि इतर प्रसार माध्यमातून निवृत्ती वेतन फॉर्म सादर केला नसल्यास माहे जुलैपासून निवृत्ती वेतन बंद होणार आहे, असे संदेश व्हॉट्स ॲप व इतर समाज माध्यमावर प्रसारीत होत आहेत. कोषागारामधून निवृत्ती वेतन स्विकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. निवृत्ती वेतन बंद करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही सुचना कोषागारास प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना नियमित निवृत्ती वेतन चालू राहील. यासाठी कोषागार कार्यालयास भेट देण्याची गरज नाही. याची नोंद राज्य शासनाच्या सर्व निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धाराकांनी घ्यावी, असे आवाहन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी केले आहे.