चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
‘आमचे गाव आमच्या शाळा’ या मोहिमेअंतर्गत चांदूर रेल्वे तालुकावासी ऐकवटले असुन स्थानिक एसडीओंसमोर चांदूर रेल्वे तालुक्यातील शासकीय शाळेंतील विविध समस्यांचा पाढा वाचला व याबाबते निवेदन सोमवारी (ता. ३०) दिले.
चांदूर रेल्वे शहर आणि तालुक्यातील सर्व प्रकारच्या शाळांची स्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. त्यातल्या त्यात जिल्हा परिषद, नगर परिषदच्या मराठी माध्यमाच्या अनेक शाळा जणू शेवटच्या घटका मोजायला लागल्याचे सर्वविदीत सत्य सर्वांनाच स्पष्ट दिसत आहे. एकेकाळी गजबजलेल्या मराठी शाळा विद्यार्थी संख्येच्या अभावाने विपन्न स्थिती भोगत आहेत. तालुक्यतील शासकीय अनेक शाळांच्या इमारती, त्यातील दारे, खिडक्या मोडकळीस आल्या आहेत, अनेक शाळांना सुसज्ज क्रीडांगण उपलब्धत नाही व असेल तर दुरावस्थेत आहेत व क्रीडासाहित्याचा अभाव आहे, शिक्षक, विद्यार्थ्यांसांठी योग्य स्वच्छतागृहांचा अभाव आहे, अनेक शाळांना योग्य विज्ञान प्रयोगशाळा नाहीत, शाळांमध्ये सफाई कर्मचारी, शिपाई, चौकीदार नाहीत त्यामुळे शालेय स्वच्छतेचा मोठा अभाव आहे, बऱ्याच ठिकाणी संगणक कक्ष आहेत पण ते शिकविण्यासाठी शिक्षकांचा अभाव आहे, शाळांत ग्रथालयांची व स्वतंत्र वाचन कक्षाची व्यवस्था नाही, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अनेक शाळेंत बेंचची व्यवस्था नसुन ज्या शाळेत डेक्स, बेंच आहे त्याची अवस्था फारच वाईट आहेत, काही ठिकाणी विद्यार्थ्यांना खाली सतरंज्या टाकून बसविल्या जाते, बऱ्याच ठिकाणी वर्गात पंख्याचा अभाव आहे, अनेक शाळांत स्वच्छ आणि आरोग्यदायी पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे यांसह विविध समस्या निवेदनात नमुद करण्यात आल्या आहे. सदरचे निवेदन एसडीओंमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, राज्य सचिव यांना पाठविण्यात आले असुन स्थानिक गटशिक्षणाधिकारी व मुख्याधिकारी यांना सुध्दा देण्यात आले. निवेदन देतेवेळी चांदूर रेल्वे तालुका शाळा बचाव समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, उपाध्यक्ष हर्षल वाघ, प्राविण्य देशमुख, सदस्य पांडुरंग डोंगरे, सतीश चौधरी, विनोद जोशी, गजानन पेठे, गजानन यादव, श्रीधर जरे, राजेश पांडे, कमलचंद गुगलीया, ललित सवाने, प्रा. प्रसेनजित तेलंग, अजिंक्य पाटणे, मेहमूद हुसैन, बंडूभाऊ यादव, राजेश भैसे, पप्पू भालेराव, विनोद लहाने, डॉ. प्रशांत कोठेकर, अथर्व श्रीखंडे, सचिन चुटके, साहिल कोल्हे, रणजीत तायवाडे, रवींद्र साबळे, भुषण नाचवणकर, अंकुश पटले, शशिकांत गाडेकर, विद्याधर वडतकर, रूपेश पुडके, शेख हसन, शितल बेराड, हर्षद गुगलिया यांसह अनेकांची उपस्थिती होती.
सुयोग्य व दर्जेदार शालेय वातावरण निर्माण करा – नितीन गवळी
भारताचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर रेल्वे शहरात झाले आहे. मात्र याच परिसरातील शासकीय शाळा दयनीय अवस्थेला पोहचणे ही एक खेदाची बाब आहे. त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय लोकं, पालक, शहरवासी एकत्र येऊन ‘चांदूर रेल्वे तालुका शाळा बचाव समिती’ स्थापन करून याचे निवेदन एसडीओ मॅडमला दिले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुयोग्य व दर्जेदार शालेय वातावरण निर्माण करा. व शिक्षण अर्हता पूर्ण करणारे तज्ञ शिक्षक उपलब्ध करून द्या अशी आमची मुख्य मागणी असुन जेणेकरून या शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतील.
नितीन गवळी
अध्यक्ष, शाळा बचाओ समिती, चांदूर रेल्वे तालुका