धामणगाव रेल्वे :
येथील मीरा छागानी नगर परिसरातील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचा प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन (तिसरे वर्ष) मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या अभिषेक, पूजन व महाआरतीने झाली. दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे परिसरात भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या वर्धापन दिन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती, पदाधिकारी, स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांनी परिश्रम घेतले. धार्मिक एकोपा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा हा सोहळा ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

















