नगरपंचायत सभागृहात नेमकं चालतंय तरी काय ? पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर; अविनाश ब्राम्हणवाडे यांची सभेच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी जोरदार मागणी

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

नांदगाव खंडेश्वर : नगरपंचायत सभागृहातील कामकाज पारदर्शक, उत्तरदायी आणि जनतेसमोर स्पष्ट व्हावे, यासाठी स्वीकृत नगरसेवक अविनाश सदाशिवराव ब्राम्हणवाडे यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकाऱ्यांकडे सभेच्या अधिकृत व्हिडिओ रेकॉर्डिंगची जोरदार मागणी केली आहे. सभागृहात होणाऱ्या चर्चांची अचूक नोंद रहावी, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि जनतेपुढे खरी वस्तुस्थिती उघड व्हावी, या उद्देशाने त्यांनी निवेदन सादर केले आहे.

नगरपंचायत सभांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होते, विकासकामांवर निर्णय घेतले जातात, निधी, कामकाज आणि विविध विषयांवर भूमिका मांडल्या जातात. अशा परिस्थितीत सभागृहातील संपूर्ण कामकाजाची अधिकृत दृश्य नोंद असणे आवश्यक असल्याचे ब्राम्हणवाडे यांनी स्पष्ट केले आहे. केवळ कागदी इतिवृत्तांवर विसंबून न राहता, प्रत्यक्ष ऑडिओ-व्हिज्युअल रेकॉर्डिंग झाल्यास चर्चेतील अचूकता, प्रशासनाची जबाबदारी आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींची भूमिका जनतेसमोर स्पष्ट होईल, असा ठाम मुद्दा त्यांनी मांडला आहे.

प्रशासनाने अधिकृत रेकॉर्डिंगची व्यवस्था करावी, अन्यथा नियमांच्या अधीन राहून वैयक्तिक स्तरावर रेकॉर्डिंग करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. “सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होत असेल, तर त्या चर्चेची नोंद कॅमेऱ्यात का नसावी?” असा थेट सवाल उपस्थित करत ब्राम्हणवाडे यांनी पारदर्शकतेचा मुद्दा मध्यवर्ती केला आहे.

या मागणीमुळे नगरपंचायत वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, प्रशासन आता यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभागृहातील कामकाज अधिक खुले, शिस्तबद्ध आणि उत्तरदायी करण्यासाठी ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे.

veer nayak

Google Ad