शैलेश अग्रवाल, अनंत मोहोड व काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार मुळकांच्या भेटीला
यादीत नसलेली जगतापची पत्नी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देवेंद्र खंडाते, प्रियंका भीमके, पंकज वाघमारे व प्रीती सुरवाडे हे काँग्रेसच्या चिन्हावर कसे?
आर्वी नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या २६ उमेदवारांना ए बी फॉर्म न मिळाल्याची तक्रार जिल्हा प्रभारी यांच्याकडे करण्यात आली होती. नगर पालिकेच्या निवडणुकीत होऊ घातलेले सर्व उमेदवार आपल्याच पक्षाने आपल्याच उमेदवारांचा व नेत्यांचा घात करण्याचे कारण काय? हा प्रश्न घेत ओरड करत होते. याबाबत जाब विचारत काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी समितीचे शैलेश अग्रवाल व प्रदेश महासचिव अनंत मोहोड यांच्यासह सर्व पदाधिकारी व उमेदवार यांनी जिल्हा प्रभारी राजेंद्र मुळक यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेत काही प्रश्न उपस्थित करून पक्षाच्या जिल्ह्यातील काही नेत्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले. यात प्रामुख्याने
काँग्रेसचे ए बी फॉर्म राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांच्याकडे गेले कसे? देवेंद्र खंडाते, प्रियंका भीमके, पंकज वाघमारे व प्रीती सुरवाडे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या चिन्हावर कसे? काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म पोहचवण्यात असमर्थता दर्शविणाऱ्या जिल्हा अध्यक्षाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या चिन्हावर लढविण्यासाठी अमर काळे व बाळा जगताप यांना एबी फॉर्म कोणाच्या परवाणगीने व केव्हा दिले? नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या शेवटल्या दिवशी आघाडी बद्दल बोलण्यासाठी त्या नेत्याला आणि खासदाराला नामनिर्देशन रॅली निघत असतांनाच जाग का आली? सर्वसंमतीने तयार केलेली प्रभारींच्या मान्यतेतील यादी वगळून वेळेवर जगतापची पत्नी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर अर्ज सादर करण्याचे कारण काय? राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी समितीचे प्रतिनिधी, प्रदेश महासचिव, शहर अध्यक्ष या सर्वांना डावलून नातेवाईक असलेल्या जगतापला जिहाध्यक्षाने ८ सदस्यांचे व १ अध्यक्षाचा एबी फॉर्म दिला कसा? राष्ट्रवादीच्या चौघांनी काँग्रेसचे एबी लावले तर त्यातील काँग्रेसचे उर्वरित ४ एबी फॉर्म मग गेले कुठे? स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात यश संपादीत करत असलेली आर्वीतील काँग्रेस कुणाच्या निर्देशावरून राष्ट्रवादीच्या खासदाराच्या लाभासाठी गहाण टाकण्यात आली? जिल्ह्यात स्वहिताचे राजकीय आणि काळे धंदे चालविण्यासाठी पोषक समीकरणं जुळविण्यासाठी आर्वी, हिंगणघाट व वर्धा मतदार संघात तह करणाऱ्या नेत्याची दादागिरी का खपवायची? आर्वीत स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता चोरट्या मार्गाने परस्पर खेळी करून उमेदवारांचा बळी घेण्याची मजल जिल्हाध्यक्षाची झाली कशी?
नेत्यांनी व उमेदवारांनी उपस्थित केलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देत हा प्रकार आपणांस मुळीच आवडला नसल्याचे सांगत जिल्हा प्रभारी राजेंद्र मुळक यांनी एबी फॉर्म शहर अध्यक्ष सुधाकर भुयार यांच्याकडेच पाठविण्याचे पक्षाचे निर्देश असल्याचे कळविले. सदर एबी फॉर्म शहर अध्यक्षांकडे न पाठवता इतरत्र पाठविल्याबाबत जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर सर्वस्वी दोषी असल्याचे प्रभारी राजेन्द्र मुळक यांनी यावेळी सांगितले. उमेद्वारांसमक्ष पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत जिल्हाध्यक्षाच्या या चुकीला क्षमा नसल्याचेही प्रभारी राजेन्द्र मुळक यांनी सर्वांसमक्ष सांगितले. त्यांनी उमेदवारांचा व नेत्यांचा रोष क्षमवण्याचा पूर्ण प्रयत्न केला व जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यावर निष्कासनाची कार्यवाही प्रस्तावित करीत असल्याचा शब्द या कट कारस्थानाला बळी पडलेल्या उमेदवारांना दिला.














