अमरावती, दि. 14 शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यदिनी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये भारतीय स्वातंत्र दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांचे सामूहिक कवायत संचलन करण्यात येणार आहे. यावर्षी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. जेवडनगर येथील मनपा उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कवायत संचलन कार्यक्रमास स्वत: मंत्री श्री. भुसे उपस्थित राहतील.
राज्यभरातील शाळांमध्ये सकाळी 9 ते 9.30 दरम्यान या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना योग्य सूचना देण्यात आल्या आहे. यात महाराष्ट्र गितासह विविध देशभक्तीपर गितांवर विद्यार्थी कवायत करणार आहेत.
शालेय शिक्षण विभागातर्फे आतापर्यंत महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर शिकवला जाणार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निर्देश दिले आहेत. यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर गायन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व शाळांमध्ये संबधित राज्याची मातृभाषा म्हणजेच महाराष्ट्रात मराठी अनिवार्य केली आहे.
जुलै महिन्यात ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमात राज्यातील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी यांनी 2 कोटी वृक्षांची लागवड केली आहे. राज्यातील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे.