धामणगाव रेल्वे (दि. ३० ऑक्टोबर २०२५) – पिंपरी-चिंचवड येथे दिनांक २६ ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या सब ज्युनियर राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत अमरावती जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचा झेंडा उंचावला.
अमरावती संघाकडून पूर्वेश आंबटकर, कृष्णा नायकवाड आणि स्वस्तिका पोळ यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. खेळातील उत्तम समन्वय, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर पूर्वेश आंबटकर आणि स्वस्तिका पोळ या दोघांची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

या यशामुळे अमरावती जिल्ह्यात तसेच स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही खेळाडूंना शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी श्री प्रितेश जणवाडे, क्रीडा शिक्षक नितीन जाधव आणि प्रतीक्षा उईके प्रशिक्षकांचे, पालकांचे आणि शाळेच्या इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सर्वांनी एकमुखाने सांगितले की, “पूर्वेश आणि स्वस्तिकाची ही कामगिरी अमरावती जिल्ह्यासाठी आणि त्यांच्या शाळेसाठी अभिमानास्पद आहे.”
अमरावती जिल्हा क्रीडा परिवार, शाळा परिवार व मित्रपरिवाराने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून आगामी राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.












