चांदूर रेल्वे :- दि. ७/१/२०२५ (बुधवार) रोजी सकाळी १० वाजता श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान, श्री क्षेत्र सावंगा (विठोबा), ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासाच्या दृष्टीने संस्थानच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अमरावती येथून सकाळी ७.३० वाजता व सायंकाळी ५.४५ वाजता, तसेच चांदूर रेल्वे येथून सकाळी ९.०० वाजता व सायंकाळी ७.१५ वाजता सावंगा (विठोबा) करीता नियमित बस सेवा सुरू करण्यात आली आहे. बस सेवेच्या प्रथम दिवशी सावंगा (विठोबा) नगरीत बस दाखल होताच संस्थानच्या वतीने बसचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी बस चालक शंकर इंदोरे व वाहक वैशाली ताले यांचा शेला, पिस, गलप, पुष्पहार व नारळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त मंडळ, गावकरी मंडळी, भाविक भक्त, कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांनी चांदूर रेल्वे ते अमरावती या बससेवेचा प्रवास करून औपचारिक शुभारंभ केला. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष कार्यालयात भेट घेऊन या बससेवेसाठी आभार व्यक्त करण्यात आले.














