शिरसगाव कोरडे (ता. चांदुर रेल्वे) येथील महिलांनी गावातील वाढत्या अवैध दारूबंदीच्या विरोधात सोमवारी (दि. ८ डिसेंबर २०२५) जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढत ठोस कारवाईची मागणी केली.

सरपंच सीमा बनसोड व उपसरपंच संगीता बदरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
गेल्या आठ महिन्यांपासून गावात अवैध दारू विक्री वाढत असून यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. तरुणांमध्ये व्यसनाधीनता, घरगुती भांडणे, महिलांवरील मारहाण वाढत असल्यामुळे महिलांनी यापूर्वी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग आदींकडे निवेदने दिली आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे महिलांचा संताप अनावर झाला आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन तात्काळ कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले.
निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद व उपअधीक्षक राजेश भुयार यांना देण्यात आले. अवैध दारूबंदीला पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी सागर महल्ले, राजू पाटील बदरे अतुल काळे, यश जवंजाळ, यश मेश्राम, रोशन आदी पदाधिकारी उपस्थित होते. महिलांनी गावाच्या सुरक्षित भविष्यासाठी दारूबंदीची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, असा निर्धार व्यक्त केला.













