चांदूर रेल्वे (प्रतिनिधी):-
अवधूत परंपरेचा वारसा जपणाऱ्या श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान, श्री क्षेत्र सावंगा (विठोबा), ता. चांदूर रेल्वे जि. अमरावती येथे यंदाही श्रावण मास निमित्त भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या दोन दिवसांचा सोहळा धार्मिक उत्साहात साजरा होणार आहे.
२३ ऑगस्ट रोजी अमावस्या विशेष कार्यक्रम :
शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण मास मांडीत सार्वजनिक भजन सुरु राहणार आहे. दुपारी ४ वाजता अमावस्या विशेष चंदनउटी उत्सव पार पडणार असून संध्याकाळी ६ वाजता बाहेरगावाहून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
२४ ऑगस्ट रोजी भव्य महाप्रसाद :
रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता अरज व आरतीचे गजरात श्रावण मास मांडीचा वाढवा होणार आहे. दुपारी १२ वाजता सर्व गावकरी व बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी भव्य महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.
अखंड हरिनामाच्या गजराने गुंजणार सावंगपूर नगरी:
या दोन दिवसीय धार्मिक सोहळ्यात भजनी मंडळांचे गायन, अखंड हरिनामाचा गजर,चंदनउटी व भजनमांड वाढव्याच्या भक्तिरसाने सावंगा नगरी गूंजून जाणार आहे. भाविकांना आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव देणारा हा सोहळा दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो.
सर्व भाविक भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या अध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, तसेच सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रवीण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी यांनी केले आहे.