“सावंगपूरचे राजे विठोबा कराहो बादशाही ! मन माझं मोहिलं माय माझी विठ्ठल रुख्माई !!”
आषाढी पौर्णिमा व गुरुपूजनाचे भक्तिभावात आयोजन
चांदूर रेल्वे (प्रतिनिधी):
तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे “आषाढी गुरुपौर्णिमा उत्सव” भक्तिभावात साजरा होणार आहे.श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने दि.१० जुलै २०२५, गुरुवार रोजी दुपारी ४.०० वाजता “चंदन उटी” हा सोहळा हजारो भाविक भक्तांचे उपस्थितीत पार पडणार आहे. त्यानंतर दि. ११ जुलै २०२५ शुक्रवार रोजी सकाळी “गुरुपूजन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अवधूत महाराज हे येथे विठोबा म्हणूनही पूजले जात असल्याने आषाढी गुरुपौर्णिमेला येथे विशेष महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थानच्या परंपरेनुसार हा उत्सव भक्तीभावाने गावातील व बाहेर गावातील हजारो भाविक भक्तांचे उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.
अलीकडेच पार पडलेल्या ज्येष्ठ अमावस्येच्या चंदन-उटी कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. भाविकांनी ‘कापुर जाळून’ आपल्या मनोकामना व्यक्त करत हा सोहळा अनुभवला होता. त्या भक्तिभावपूर्ण वातावरणानंतर आता पुन्हा एकदा आषाढी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने “चंदन-उटी उत्सव” भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, तसेच सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी, प्रवीण कुकडकर यांची उपस्थिती राहणार असून हा उत्सव यशस्वी करण्याचे दृष्टीने विश्वस्त मंडळ प्रयत्नशील आहे.
कार्यक्रमानंतर संस्थानचे महाप्रसाद (अन्नदान) समितीच्या माध्यमातून बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आयोजित पवित्र सोहळ्याचा लाभ घेण्याकरिता संस्थानच्या वतीने सर्व भक्तांना तन, मन आणि धनाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.