चांदूर रेल्वे :-
महाराष्ट्रातील ४५० ते ५०० वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री विठोबा संस्थान ऊर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान, श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असूनही मूलभूत सोयी-सुविधांच्या अभावामुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्षभरात सुमारे १५ ते १६ लाख भाविक दर्शनासाठी येत असलेल्या या तीर्थक्षेत्राच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संस्थानच्या वतीने करण्यात आला आहे.
गुढीपाडवा व दसरा यात्रेला दरवर्षी ७२ फूट उंचीच्या दोन झेंड्यांवर नवीन कापड चढविण्याचा भव्यदिव्य नेत्रदीप सोहळा पार पडतो. गुढीपाडव्याच्या यात्रेला एकाच दिवशी ५ ते ६ लाख भाविक उपस्थित राहतात. शेकडो क्विंटल कापूर जाळला जात असल्याने ही यात्रा ‘कापुराची यात्रा’ म्हणून ओळखली जाते. श्रावण, कार्तिक, पौष व चैत्र मासात ३० ते ४५ दिवस अखंड जागृती भजन, दर अमावास्येला चंदनउटी, तसेच दर बुधवार व रविवारला हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतानाही एसटी बस सेवेचा अभाव गंभीर समस्या ठरत आहे. चांदूर रेल्वे व अमरावती येथून प्रत्येकी सकाळ-संध्याकाळ अशा चार फेऱ्या सुरू करण्याबाबत तीन वर्षांपासून पाठपुरावा संस्थानने केला.त्याला काही अंशी यश ही आले, बस फेऱ्या सुरु झाल्या परंतु त्या नियमित नसल्याने प्रवासी भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. परिणामी भाविकांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते.
सावंगा विठोबा येथे जाणारे मांजरखेड, लालखेड, मोगरा व सावंगा फाटा येथील सर्व रस्ते अत्यंत नादुरुस्त व अपघातप्रवण झाले आहेत तर गावाशेजारी असणाऱ्या खोलाड नदीच्या पुलावर मात्र कठडाच नसल्याने जिवीत हानी होण्याची दाट शक्यता आहे. यात्रेच्या काळात हे रस्ते ४ ते ५ तास ठप्प होतात. त्यामुळे रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गावांच्या प्रवेशद्वारावर दिशादर्शक प्रवेशद्वार उभारण्याचीही गरज व्यक्त करण्यात आली आहे.
शासनाने तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा दिला असला तरी अपेक्षित विकास झालेला नाही. या निधीतून उभारलेले स्त्री भक्त निवास ग्रामपंचायतीच्या अधिनस्त असल्याने ते पूर्ण क्षमतेने वापरात नाही. इतर कोणत्याही विकास निधीचा लाभही या तीर्थक्षेत्राला मिळालेला नाही.
दरम्यान, सावंगा विठोबा जवळील कृष्णाजी सागर तलाव व पर्यटनस्थळ भाविकांसाठी आकर्षण ठरू शकते. मात्र सध्या ९ किमीचा फेरा घ्यावा लागतो. जर तलावातून सावंगा (विठोबा) येथे थेट पूल बांधण्यात आला, तर हे अंतर केवळ ३ किमी राहील व तीर्थक्षेत्रासह पर्यटनाचा मोठा लाभ होईल, असे संस्थानचे म्हणणे आहे.
संस्थानच्या वतीने भाविकांसाठी प्रसादालय सुरू करण्यात आले असले तरी एकूणच तीर्थक्षेत्र विकासासाठी वरील सर्व बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न भाविकांमधून उपस्थित केला जात आहे.
“सध्यस्थितीत संस्थानच्या वतीने भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी केवळ भाविकांच्या देणगीचा वापर केला जात आहे, यातूनच संस्थानने दोन वर्षापासून सुरु केले प्रसादालय भाविकांच्या सेवेत आहे.संस्थानचा विकास केवळ भाविकांच्या देणगीतून केला जात असून शासनाकडून अद्याप ठोस अशी कोणतीही विकासात्मक कार्यवाही नाही.या संस्थानाची लाखो भाविकांची सर्वात मोठी व प्रसिद्ध गुढीपाडवा यात्रा दि.१९ मार्च २०२६ ला असल्याने भाविकांच्या सोयीकडे लक्ष देईल काय ?”
-पुंजाराम नेमाडे
अध्यक्ष, श्री विठोबा संस्थान, सावंगा (विठोबा)











