धामणगांव रेल्वे | २६ जानेवारी २०२६
एस.ओ.एस. कब्स व स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगांव रेल्वे येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन दि. २६ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साह, शिस्त व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थी कमांडर चैतन्य डहाके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी मानवंदना परेड सादर करून राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. राष्ट्रगीत व “भारत माता की जय” या घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवी (ब) च्या कनक पालीवाल व ज्ञानवी नायकवाड यांनी आत्मविश्वासपूर्ण व सुमधुर आवाजात केले. त्यांच्या सूत्रसंचालनाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
यानंतर इयत्ता पाचवी (अ/ब) च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच गौरव देवघरे सर व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या तबला वादनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशभक्तीपर विचार मांडले. त्या म्हणाल्या—
“नको विचारू किती वादळे या वतनाच्या वाटेवर आली,
भारताच्या निर्धारापुढे प्रत्येक वादळ हरली।
जे झिजून गेले, ते इतिहास झाले,
जे कधीच झुकले नाहीत, तेच ओळख बनले।।
हा देश केवळ भूमीचा तुकडा नसून
तो कोट्यवधी हृदयांची धडधड व स्वप्नांची कहाणी आहे.”
यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उद्गार सांगितले—
“तुझे साठी मरणं ते जननं, तुझविण जननं ते मरणं.”
अर्थात, भारतमातेकरिता मरणे हेच खरे जगणे आहे. त्यांच्या विचारांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांमध्ये राष्ट्रप्रेम अधिक दृढ झाले.
यानंतर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर भाषणे सादर केली.
एस.ओ.एस. कब्सच्या प्रांगणात प्री-प्रायमरी हेड माननीय शबाना खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
के.जी. १ ची विद्यार्थिनी विहा चांडक, के.जी. २ च्या वैदेही शर्मा व अदिती कोवे यांनी आत्मविश्वासाने आपले मनोगत व्यक्त केले.
इयत्ता सातवी (अ/ब) च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीपर नृत्य व नारी शक्तीवर आधारित नाट्यप्रयोग विशेष लक्षवेधी ठरले. या सादरीकरणातून नारी सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
इयत्ता दुसरीतील स्वरित खवले व इयत्ता तिसरीतील वल्लभ खोंडे यांनी संविधान निर्मिती व प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
इयत्ता सहावी (अ) च्या अद्वैत डोंगरे यांनी प्रभावी भाषणातून देशप्रेम, संविधानाचा सन्मान व जबाबदार नागरिक होण्याचा संदेश दिला.
इयत्ता पाचवी (अ) च्या गुणाज्ञा झांबरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
इयत्ता आठवी (ब) च्या श्रेष्ठी डाफे यांनीही प्रभावी भाषण सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. जितेंद्र प्रकाशराव मिरगे, माजी सैनिक (हवालदार), मराठा लाईट इन्फन्ट्री, मराठा रेजिमेंट सेंटर, बेळगाव (कर्नाटक) हे होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात शिस्त, देशप्रेम व राष्ट्रसेवेचे महत्त्व स्पष्ट करताना “राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे” असे प्रतिपादन केले.

शाळेतर्फे आयोजित विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत (दिल्ली) रोहन खोब्रागडे यांना सुवर्णपदक तर कृष्णा चौधरी यांना रौप्यपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कथक नृत्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल उर्वी राजनकर, सांची मूंदडा व सानवी यांना प्रमाणपत्रे व ट्रॉफी देण्यात आल्या.
शिक्षकवर्गाने सादर केलेले “ आपली धरती, आपला अंबर, आपला हिंदुस्तान” हे देशभक्तीपर गीत विशेष भावस्पर्शी ठरले.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी, एस ओ एस हेड शबाना खान, प्रशासकीय अधिकारी प्रीतेश जुनवाडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच रुबी हाऊस प्रमुख तृप्ती सुतोने यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मिठाई व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. अखेरीस शाळेचे डेप्युटी हेड बॉय संस्कार हटवार यांनी प्रमुख अतिथी, प्राचार्या, पालक, शिक्षक, विद्यार्थी व सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.














