गरीबीवर मात करत राजुरा गावातील साहिल धारणेची लोको पायलटपदी निवड. पानटपरी चालवणाऱ्या वडिलांच्या कष्टांची जाण ठेवत संघर्षातून घडवले यश. गावकऱ्यांकडून जल्लोषात सत्कार

0
16
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे – (ता. प्र.) 

चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा या छोट्याशा गावातील साहिल सुधाकरराव धारणे या युवकाने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर मोठे यश संपादन केले आहे. अतिशय गरीब परिस्थितीत वाढलेल्या साहिलची इंडियन रेल्वेमध्ये लोको पायलट पदावर निवड झाली असून त्याच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

साहिलचे वडील सुधाकरराव धारणे हे गावात पानटपरीचा छोटासा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती हलाखीची असतांनाही साहिलने कधीही परिस्थितीसमोर हार मानली नाही. उलट आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव मनात ठेवत त्याने शिक्षणासोबत वडिलांच्या पानटपरीच्या व्यवसायातही हातभार लावला. संघर्षाची मशाल हाती घेऊन त्याने अभ्यासाची पराकाष्ठा करत आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा सुरूच ठेवला.

साहिलचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण स्व. खंडेराव देशमुख कनिष्ठ माध्यमिक विद्यालय, राजुरा येथे झाले. त्यानंतर त्याने गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, अमरावती येथून इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. या काळात तो तीन वर्षे समाजकल्याण विभागाच्या अमरावती येथील वसतिगृहात राहिला. पुढील शिक्षणासाठी त्याने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस), अंधेरी (मुंबई) येथे प्रवेश घेतला. मुंबईतही समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहून त्याने शिक्षण पूर्ण केले.

शिक्षणानंतर तो काही काळ गावात परतला आणि शाहू–आंबेडकर अभ्यासिका येथे अभ्यास करत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली. त्याचबरोबर वडिलांच्या पानटपरीच्या व्यवसायात मदत करत कुटुंबाची जबाबदारीही सांभाळली. अखेर त्याच्या अथक परिश्रमाला यश मिळाले आणि इंडियन रेल्वेमध्ये लोको पायलट पदासाठी त्याची निवड झाली. साहिलच्या या यशानंतर राजुरा गावात त्याचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासिका येथील विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्य भूषण शिवदासराव काळे मित्रपरिवाराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील ग्रामस्थ व नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जल्लोषाच्या वातावरणात साहिलचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मेहनत, शिस्त आणि ध्येयवेड्या वृत्तीने यश मिळवता येते असे सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजक ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, “गावातील युवकांनी शिक्षणाच्या बळावर उच्च पदांवर पोहोचून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे. साहिलच्या सत्कारातून इतर मुलांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या मनातही नवीन ऊर्जा निर्माण व्हावी असेही ते म्हणाले. राजुरा गावातील साध्या कुटुंबातील मुलाने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश आज अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. साहिल धारणेच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.

मेहनतीवर विश्वास ठेवा – साहिल धारणे

यावेळी साहिल धारणे याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “माझे आई-वडील आणि कुटुंब हेच माझे खरे मार्गदर्शक आहेत. कोणतेही ध्येय साध्य करायचे असेल तर त्यासाठी मनापासून प्रयत्न करा, विचलित होऊ नका आणि मेहनतीवर विश्वास ठेवा.”

veer nayak

Google Ad