शासनाने शैक्षणिक सत्राचा वाढविलेल्या कालावधीचा शिक्षकांसाठी सदुपयोग करता यावा या हेतूने विद्यालय व कनिष्ठ महाविदयालयातील शिक्षकांसाठी इंग्रजी विषयाच्या सहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दिनांक 2/05/2024 ते 8/05/2024 पर्यंत दोन सत्रात होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आज विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत शेंडे उपमुख्याध्यापक श्री गोपाल मुंधडा पर्यवेक्षक श्री प्रदिप मानकर यांच्या हस्ते पार पडले. विद्यालयातील शिक्षकांमध्ये इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी, विद्यालय परीसरात, प्रत्यक्ष वर्गात इंग्रजी संभाषण वाढावे, व्याकरणात सुधारणा व्हावी, संभाषण कौशल्य सुधारावे, ज्ञानात भर पडावी, वर्गातील अध्यापनात होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या व विद्यार्थ्यांमधील इंग्रजी विषयाची भिती दूर करण्यासाठी हातभार लागावा याकरीता विदयालयातील शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविकातून प्राचार्य शेंडे सर यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाचे अनुभवी जेष्ठ शिक्षक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री प्रदिप मानकर सर यांनी इंग्रजी विषय शिकविण्याची पद्धत अधिक आधुनिक कशी करता येईल?, भाषिक कौशल्यातील सुधारणा, बेसिक ऑफ इंग्लीश लँग्वेज, बेसिक ऑफ इंग्लीश ग्रामर, इंग्रजी विषयाचे ज्ञान वाढविण्यासाठी सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे या मुद्यांवर प्रात्यक्षिका द्वारे मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांचा कृतियुक्त सहभाग वाढविण्यासाठी एक ॲक्टीव्हीटी ही घेण्यात आली. सोबत इंग्रजी विषयाच्या बेसिक ग्रामर च्या प्रसिद्ध व ऑथेंटिक ग्रंथांची माहिती देण्यात आली.
दुसऱ्या सत्रात विद्यालयातील इंग्रजी विषयाचे अनुभवी व जेष्ठ शिक्षक श्री प्रमोद हातेकर सर यांनी काळ, काळाचे प्रकार, त्यांचे उपयोग, वापरावयाची सूत्रे, पद्धती याबाबत दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले. इंग्रजीतील क्रियापदे या भागावर श्री समिर हिरुरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांच्या समस्यांचेही समाधान करण्यात आले. कार्यशाळेच्या दरम्यान शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग घेण्यात आला. या कार्यशाळेला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.