आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर रिपल राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग तळेगाव -आर्वी वरील वर्धमनेरी गावा जवळ सुरू केलेल्या राणे सूर्योदय पेट्रोलियम या नवीन पेट्रोल पंपाचे लोकार्पण कौंडण्यपूर येथील रुक्मिणी पिठाचे पीठाधीश राजराजेश्वर माऊली सरकार यांच्या विशेष उपस्थितीत आणि माननीय खासदार अमरभाऊ काळे, आमदार दादारावजी केचे, आमदार सुमितभाऊ वानखडे , श्री दिलीपभाऊ निंभोरकर तसेच तळेगाव व वर्धमनेरी येथील सरपंचांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाले.
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्याने जयपुर (कोथळी) जिल्हा बुलढाणा येथील प्रत्यक्ष श्री गजानन महाराजांनी आपल्या भक्ताला दिलेल्या मूळ पादुकांचा दर्शन सोहळा, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी समर्थ श्री राजेश्वर माऊली सरकार यांच्या शुभहस्ते श्री गजानन महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर डॉक्टर रिपल राणे व सौ कालीन्दी राणे यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन स्वागत-सत्कार केला.
याप्रसंगी श्री राजेश्वर माऊली सरकार यांचे प्रवचनाचा लाभ उपस्थिताना झाला, प्रसंगी शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डॉ रिपल राणे पासून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन माऊली सरकारने केले. यावेळी खासदार अमरभाऊ काळे, आमदार दादारावजी केचे, आमदार सुमितभाऊ वानखेडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना डॉक्टर राणे यांच्या मागिल पंचवीस वर्षांपासूनच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख व प्रशंशा करून त्यांच्या या नवीन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. डॉक्टर रीपल राणे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की व्यवसाय कुठलीही असो तो 100 टक्के इमानदारीने करणे ही राणे परिवाराची परंपरा राहिली आहे व यापुढेही ही परंपरा आम्ही पार पाडू.
परिसरातील नागरिक बंधू भगिनी व निमंत्रितांच्या उपस्थितीत पादुका पूजन, महाआरती व लोकार्पणानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ परिसरातील शेकडो उपस्थितानी घेतला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉक्टर राणे कुटुंबीय व मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.