तालुक्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले असताना शासनाने तातडीने मदतीची घोषणा करावी, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशा ठाम मागणीसाठी तालुका व शहर काँग्रेस कमिटी, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे यांच्या वतीने सोमवारी भव्य धडक मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याला अभिवादन करून झाली. त्यानंतर नगरपरिषदेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करून मोर्चा प्रचंड जनसमुदायासह तहसील कार्यालयावर धडकला. शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मोर्चा भव्यदिव्य ठरला.
या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार मा. प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांनी केले. यावेळी कार्यकर्ते, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्तरावरील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चातील प्रमुख मागण्या
तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी.
शेतकऱ्यांना पिकांना हमीभाव द्यावा.
महावितरणकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी अवास्तव विजबिल तातडीने रद्द करावीत.
रोजगार हमी योजना व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व पात्रांना त्वरित द्यावा.
गावागावांतील लोडशेडिंग बंद करून अखंडित वीजपुरवठा करावा.
तहसीलवर पोहोचल्यावर मोर्चाचे मोठ्या सभेत रूपांतर झाले. सभेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या तसेच शासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र टीका करण्यात आली.
सभेत बोलताना माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप म्हणाले, “शेतकऱ्यांचे हाल बघून शासन गप्प बसले आहे. शेतकऱ्यांच्या घामाने आणि कष्टाने देश उभा आहे, पण आज त्यांनाच न्याय मिळत नाही. शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत दिली नाही, तर आम्ही शांत बसणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “आमच्या शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या जर दिवाळीपूर्वी मान्य झाल्या नाहीत तर आम्ही एस.डी.ओ. कार्यालयात बेसन भाकर घेऊन काळी दिवाळी साजरी करू आणि पुढे आणखी तीव्र आंदोलन छेडू.”
सभेनंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मोर्चा जयघोष, घोषणाबाजी आणि उत्स्फूर्त सहभागामुळे परिसर दणाणून गेला होता