स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये
धामणगाव रेल्वे: स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत २१ डिसेंबर २०२४ रोजी गणित दिन आणि आंतरराष्ट्रीय ध्यान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गणित शिक्षक अनुप अग्रवाल उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात शांत आणि सकारात्मक वातावरणात ध्यान सत्राने करण्यात आली. इंग्रजी शिक्षिका शीतल एकोणकर यांनी ध्यानाचे महत्त्व पटवून देत मानसिक स्थैर्य आणि तणावमुक्त जीवनासाठी ध्यानाचे फायदे विद्यार्थ्यांना समजावले. इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी आराध्या बेरेठियाने प्रभावीपणे चक्रसाधनेचे सादरीकरण केले व विद्यार्थ्यांनाही ध्यानप्रक्रियेत सहभागी करून घेतले. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक उर्जा मिळाली आणि सत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
यानंतर गणित दिनाचे उपक्रम उत्साहात पार पडले. चौथीच्या विद्यार्थ्यांनी गणितीय रांगोळीद्वारे कला आणि गणित यांचा अनोखा संगम सादर केला. सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी बेब्रास, First in Math आणि टांग्राम यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गणिताच्या आधुनिक संकल्पना शिकवल्या. त्यात First In Math मधे वर्ग ४ ची विद्यार्थिनी आराध्या बरेठीया आणि वर्ग ६ वी चा विद्यार्थी अंश राठोड यांनी सर्वात जास्त स्टिकर्स गोळा करून मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्राप्त केले. सातवीतील विद्यार्थी लखन राठीने प्रख्यात गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची भूमिका साकारून त्यांच्या जीवनप्रवासाचे प्रभावी सादरीकरण केले.
याशिवाय प्रश्नमंजुषा आणि पोस्टर स्पर्धांनी विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण केली. गणित शिक्षिका आभा चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौशल्यपूर्ण संचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांनी गणित व ध्यान यांचे जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणित शिक्षक शुभम मिश्रा, दीप्ती चौबे, आणि विघ्नेष मडावी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन पूजा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
दोन्ही उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी प्रेरणादायी ठरले असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.