कारंजा तालुक्यातील मेटहिरजी येथे चराईसाठी जनावरे घेऊन जंगल परिसरात गेलेल्या रमेश पिंपळे वय 67 वर्ष रा. मेटहिरजी या गुराख्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना कारंजा तालुक्यातील उमरविहरा भागातील कंपार्टमेंट क्रमांक 41 मध्ये आज 10 रोजी घडली. या घटनेची माहिती आमदार सुमित वानखेडे यांना मिळताच तत्परतेने त्यांनी कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतकाच्या नातेवाईकाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व तात्काळ 5 लाखाचा धनादेश दिला.
वन विभागाच्या अधिकार्यांना भविष्यात गुराख्यांना जंगलात जनावरांना चराईसाठी नेण्याची वेळच येऊ नये म्हणून बाहेरच चारा उपलब्ध कसा करून देता येईल याचा रोड मॅप तयार करण्याचे निर्देश आमदार सुमित वानखेडे यांनी दिले. तसेच त्यांनी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याबाबत आश्वस्त ही केले. कोणत्याही व्यक्तीचा प्राण जाऊ नये यासाठी प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत जंगला शेजारी असलेले माणसं आणि जंगलातील हिंस्त्रप्राणी दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावे, असे वन विभागाच्या अधिकार्यांना आमदार सुमित वानखेडेंनी सांगितले.
या प्रसंगी मंगेश ठेंगडी उपसंचालक बोर व्याघ्र प्रकल्प, लोंढे सहाय्यक वनसंरक्षक, ताल्हन वनपरिक्षेत्र अधिकारी हिंगणी बफर, गजबे वनपरिक्षेत्र अधिकारी बांगडापूर बफर, खेलकर, अखंडे, डॉ. सत्यवान वैद्य वैद्यकीय अधिकारी, डॉ. घागरे ऑर्थो सर्जन यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.