आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सतत तेवत रहावे या उद्देशाने त्यांच्या कार्यात सदैव पुढाकार घेणाऱ्या त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर स्मृतीनिमित्त आर्वी येथिल सिद्धार्थ बुद्ध विहार आंबेडकर नगरात महीलांचा सत्कार सोहळा रविवार दि. 22 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे मुख्य प्रवर्तक व स्वराज आघाडीमहा.राज्य चे प्रदेशाध्यक्ष डाॅ राजपाल भगत व त्यांचे सहकारी डाॅ किशोर धनगर व प्रा. अरविंद सुरोशे यांनी केले. या कार्यक्रमात समता सैनिक दल आर्वी, आदर्श सामाजिक संघटना व भारतीय बौद्ध महासभेचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॅ बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून निमंत्रित केलेल्या महिलांकडून करण्यात आले.त्यात समाजकार्यकर्त्या भारती बनसोड, यशोधरा सोनोने, विशाखा कळंबे शुभांगी कुंभारे, व परतवाडा येथून पाहुणे म्हणून आलेल्या यशिता चित्ते, वंदना दारव्हेकर व माधुरी सुरोशे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन भारती बनसोड यांनी केले. तर पुढील नियोजन डाॅ राजपाल भगत यांनी केले. कार्यक्रमात प्रा. अरविंद सुरोशे, डाॅ किशोर धनगर, मधुकरराव सवाळे, वंदना दारव्हेकर, यशिता चित्ते माधुरी सुरोशे व शुभांगी कुंभारे यांनी आपले विचार मांडले. शेवटी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर महीलांचा सत्काराला डाॅ बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाच्या विशाखा कळंबे यांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या महीलांना साडी देवून सुरूवात झाली. एकूण पंचावन्न महीलाचा सन्मान करण्यात आला. इतर महीलांचा सत्कार कार्यक्रमाला उपस्थित महिलांकडून करण्यात आला.