घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी २६ जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण

0
11
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

तळेगाव दशासर (ता. धामणगाव रेल्वे) : मागील दहा महिन्यांपासून घरकुल योजना १४ व १५ व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने पाठपुरावा करूनही दोषींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने तळेगाव दशासर येथील ग्रामस्थ पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहेत. येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, तळेगाव दशासर येथे हे आमरण उपोषण सुरू होणार आहे.

या प्रकरणात एप्रिल महिन्यात ग्रामस्थांनी आमरण उपोषण करून चौकशी समिती नेमण्याची मागणी केली होती. त्यानंतर चौकशी समितीचे दोन अहवाल तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या दालनात झालेल्या सुनावणीचा अहवाल सादर होऊनही, भ्रष्टाचारात सहभागी असलेले संबंधित व्यक्ती आजही राजरोसपणे मोकाट फिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, चौकशी अहवालांचा आधार न घेता सुनावणी घेण्यात आली असून, त्या सुनावणी प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वगळण्यात आले. तसेच वारंवार तक्रारी, पायपीट करूनही पंचायत समिती स्तरावर कारवाईचे आदेश होऊनसुद्धा अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही.

या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, दोषींवर तात्काळ कारवाई, चौकशी अहवालांची अंमलबजावणी व संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याच्या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी पुन्हा आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.

veer nayak

Google Ad