धामणगाव रेल्वे :- यवतमाळ मार्गावर असलेल्या दत्तापूर शासकीय गोदामच्या मागे असलेल्या झुडपी वनात एक अज्ञात मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना मंगळवार ३० एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. सदरच्या मृतदेहाचे धड अर्धवट असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
यवतमाळ मार्गावर दत्तापुर सर्व पेट्रोल पंप च्या बाजूला असलेल्या शासकीय गोदामाच्या मागील परिसरातील गुरुवारी ३० एप्रिल च्या दुपारच्या वेळी बकऱ्या चारणाऱ्या गुरख्यांना काटेरी झुडुपात अंदाजित ३० ते ४० वयोगटातील एक अनोळखी मृतदेह असल्याचे आढळून आले.सदरचा मृतदेह अर्धवट असल्याने वाऱ्यासारखी ही माहिती शहरात पसरली.सायंकाळी ७ च्या दरम्यान दत्तापूर पोलिसांना सुद्धा घटनेची माहिती मिळताच ठाणेदार नितीन देशमुख यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले.काटेरी झाडाच्या झुडुपात खाली पडून असलेल्या या अनोळखी मृतदेहाला कमरेच्या वरील धड नव्हते तर जवळच दहा ते पंधरा फुटावर त्याची कवटी आढळून आली.पायांमध्ये भुरकट रंगाचा जीन्स घातलेला दिसून आला तर काळ्या रंगाच्या प्लास्टिक चपला बाजूला पडून असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आशिष कांबळे यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली आहे.काटेरी वनाच्या या परिसरात रात्र झाल्याने अंधार पसरला होता त्यामुळे सदरच्या मृतदेहाचा पंचनामा व उत्तरीय तपासणी आज बुधवारी होणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.संशयास्पद स्थितीत अर्धा अधिक धड नसलेला मृतदेह आढळून आल्याने हा उष्माघाताचा बळी की आकस्मिक मृत्यू ? मृत्यूचे नेमके कारण काय ? हा अपघात की घातपात ? या प्रश्नाना तोंड फुटले आहे त्यामुळे शहरात मात्र विविध चर्चांना उधाण आले आहे. कमरेचा वरील संपूर्ण शरीर नष्ट झाल्याचे दिसून येत असल्याने हा मृतदेह जवळपास आठ ते दहा दिवसांपूर्वीचा असावा व गावठी कुत्र्यांनी त्याला नष्ट केल्या असावे असा अंदाज व्यक्त केला जात असला तरीसुद्धा मृतावस्थेत असलेल्या या अनोळखी इसमाच्या संदर्भात चौफेर तपास पोलीस विभागाकडून केला जात आहे.