वार्ताहर : दाभाडा
दाभाडा गावात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण यंदाही उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी पोळा हा फक्त सण नसून त्यांच्या शेतमित्र असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. यावेळी गावातील शेतकरी बांधवांनी आपल्या बैलजोड्यांना विशेष सजावट करून मिरवणुकीत सहभागी केले.
या पोळ्याची तयारी शेतकरी बांधव दहा ते पंधरा दिवस आधीपासूनच करतात. बैलांचा साज, रंगीत मठाती, मढवलेली शृंगारे, आकर्षक कपडे आणि शोभेच्या वस्तू यामुळे बैल अधिकच देखणे भासतात. शेतकरी बांधव मोठ्या मेहनतीने आपली जोडी सजवतात. पोळ्यामध्ये उत्कृष्ट मठाती, सुदृढ जोडी, सजावट आणि शिस्तबद्ध मांडणी या निकषांवर परीक्षक मंडळाकडून पाहणी करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक जाहीर केले जातात आणि विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात येते.
दाभाडा येथील माताजी मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले. या पोळ्याचा एक मोठा ऐतिहासिक वारसा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात व गावात एक वेगळीच उत्सवमय वातावरणाची अनुभूती मिळते.
या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांद्यांना तूप-लोणी लावून त्यांना दुसऱ्या दिवशी जेवणाचे आमंत्रण दिले जाते. तर पोळ्याच्या दिवशी बैलांना गोडधोड व पारंपरिक पदार्थ खाऊ घालून त्यांचा सत्कार केला जातो. हा शेतकऱ्यांचा आपल्या जीवाभावाच्या साथीदाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे.
गावातील महिला, लहान मुले, तसेच मान्यवर मोठ्या संख्येने या सणात सहभागी झाले. संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक खेळ, गाणी आणि सजवलेल्या बैलजोड्यांच्या मिरवणुकीमुळे पोळा सणाने गावात जल्लोषाचे वातावरण रंगवले.
एकंदरीत दाभाडा येथील बैलपोळा सण यंदाही शेतकरी बांधव व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अत्यंत यशस्वी आणि भव्यदिव्य पद्धतीने पार पडला.