अमरावती, दि. 14 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेकरिता बँक खाते हे आधार सिडींग करणे आवश्यक असून खात्याला आधार सिडींग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते संबंधित बँकेत सिडींग करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
डिबीटीव्दारे थेट लाभ हस्तांतरणासाठी बँक खाते आधार सिडींग करणे अनिवार्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज केला तरी सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून दरमहा 1 हजार 500 रुपये लाभ मिळणार आहे. दि. 1 ते 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांना 17 ऑगस्ट रोजी थेट डिबीटीव्दारे त्यांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिण्याचे लाभ जमा होणार आहे. तसेच दि. 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी करुन सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात येईल.