अमरावती, दि. 23 : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत जो निधी प्राप्त झालेला आहे, तो निधी बँकेने इतर व्याज किंवा कर्ज यांच्या स्वरूपात अजिबात कपात करू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिली आहे. लाभार्थ्यांनी आपल्या खात्यातील पैसे कपात झाले असल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा किंवा अंगणवाडी सेविकांमार्फत आपल्या खात्यातून रक्कम कपात झाल्याबाबत कळवावे. अशा बँकेवर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जाहीर केले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने’ला दिवसेंदिवस अमरावती जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ज्या लाभार्थी महिलांनी यापूर्वी नोंदणी केली नव्हती, ते लाभार्थीही आता मोठ्या प्रमाणावर नोंदणी करीत आहेत. अमरावती जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या सहा लक्षच्या जवळपास पोचली असून यापैकी 24 ऑगस्ट पर्यंत नोंदणी झालेल्या सर्व लाडक्या बहिणींना 31 ऑगस्टपर्यंत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता प्राप्त होईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलैपासून सुरू झाली असून 1 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत चार लाख लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. लाडकी बहीण योजना या पोर्टलवर सध्या अंगणवाडी सेविकांच्या मार्फत लाभार्थ्यांची नोंदणी अविरत सुरू आहे. यामध्ये जवळपास दोन लाख लाभार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यांची छाननी महिला बालविकास विभागातील अधिकारी -कर्मचारी काळजीपूर्वक करीत आहेत. यातील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मान्य करून शासनाकडे पाठवण्यात येतील आणि या सर्व लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा लाभ प्राप्त होईल.
ज्या लाभार्थ्यांना अद्यापही निधी प्राप्त झाला नाही त्याला लाभार्थ्यांचे आधार सीडिंग नसल्यामुळे ही तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. त्या लाभार्थ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क करून तात्काळ आपल्या आधार कार्ड सीडिंग करून घ्यावे. ज्यामुळे त्यांच्या खात्याला तात्काळ जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होतील. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी सुरुवातीला अर्ज भरताना काही प्रमाणपत्र कमी दिले होते, त्यामुळे त्यांच्या अर्ज अंशतः रद्द करण्यात आले होते, त्यांनी ज्या ठिकाणी आपले अर्ज भरले तेथील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आपले उर्वरित प्रमाणपत्र दिल्यास त्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यात निधी जमा होईल.