चादूर रेल्वे — येथे आज होऊ घातलेल्या एका कार्यक्रमावर तीव्र आक्षेप नोंदवत निलेश उर्फ पप्पू भालेराव, नगरसेवक व गटनेते (चादूर रेल्वे), यांनी सदर कार्यक्रम असंविधानिक असल्याचा आरोप केला आहे. कार्यक्रमाच्या नावाखाली सुरू असलेल्या गाजावाज्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
निलेश पप्पू भालेराव यांनी आरोप करताना सांगितले की, संबंधित कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या वैधानिक परवानग्या, प्रशासकीय मंजुरी तसेच नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत कार्यक्रमाचे उदात्तीकरण करणे व मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देणे हे जनतेची दिशाभूल करणारे असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले,
“लोकशाही व्यवस्थेत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम हा संविधानिक चौकटीत आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच झाला पाहिजे. नियमबाह्य कार्यक्रमांना राजकीय रंग देऊन जनतेत संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे.”
या प्रकरणी संबंधित प्रशासनाने सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या आरोपांमुळे चादूर रेल्वे परिसरातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.















