धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथे श्री समर्थ योगेश्वर महाराज संस्थान – तनाची झोपडी येथे मार्गशीर्ष त्रयोदशीनिमित्त आयोजित करण्यात आलेली दोन दिवसांची अखंड भजनाची मांड अत्यंत भक्तिमय व शांततेच्या वातावरणात संपन्न झाली.
बुधवारी पहाटेच्या चौघड्यापासून अवधूत भजनाची मांड बसवून जागरणास सुरुवात करण्यात आली. सलग ४८ तास अखंड सुरू असलेल्या भजनामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. गुरुवारी महाराजांच्या विधीवत पूजनानंतर सामूहिक आरती पार पडली. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

कावली येथील श्री समर्थ योगेश्वर महाराज संस्थान – तनाची झोपडी हे अवधूत महाराजांचे जागृत देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. यंदाच्या मार्गशीर्ष अखंड भजन सोहळ्यालाही परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थानचे प्रमुख माधव शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माने नटलेला हा अखंड भजन सोहळा भाविकांसाठी समाधान व आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरला.

















