अमरावती, दि. 20 अमरावती येथील पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे देशाच्या अर्थकारणाला हातभार लागणार आहे. याठिकाणी तीन लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. टेक्सटाईल पार्कमुळे याठिकाणी आमुलाग्र बदल होणार आहेत. या भागाच्या औद्योगिक क्रांतीसाठी हे क्रांतीकारी पाऊल आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्यांच्या हस्ते वर्धा येथून नांदगाव पेठ येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन करण्यात आले.
नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र येथे वर्धा येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. खासदार डॉ. अनिल बोंडे, नवनीत राणा, आमदार रवी राणा, डिगर गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रज्ञा बाजारे, पिंपर विहीरच्या सरपंच मुक्ता ठाकरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता ए. बी. डाबेराव, सहायक पोलिस आयुक्त सागर पाटील, के. एम. पुंडकर, प्रादेशिक अधिकारी प्रशांत पडाळकर, वस्त्रोद्योग उप वस्त्रोद्योग अभियंता सुधीर अमृतकर, तहसीलदार वैशाली पाथरे, उप अभियंता संजय विधळे, उप अभियंता श्री. राठोड, क्षेत्र व्यवस्थापक सुभाष राऊत आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क ही वस्त्रोद्योग क्षेत्रात क्रांती आणणारी योजना आहे. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क येथे जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. यामुळे थेट शेतातून विदेशात निर्यात होणारे कापड निर्मितीकरीता संपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील. नांदगाव पेठ येथील अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्रात 1 हजार हेक्टर जागेमध्ये पीएम मित्रा पार्क उभारण्यात येणार आहे. येथे 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. निर्यात क्षमता वाढीसाठी फाईव्ह एफ व्हिजन ठेवण्यात आले आहे. यामध्ये फार्म ते फायबर, फायबर ते फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन ते फॉरेन अशा पद्धतीने कार्यप्रणाली राबविण्यात येणार आहे. पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमुळे अमरावतीचे नाव देशाच्या नकाशावर अधोरेखित होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेक्सटाईल पार्कमुळे औद्योगिक वसाहतीचा चेहरामोहरा बदलला आहे. याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्यास मदत झाली आहे. याठिकाणी तीन लाख रोजगार निर्माण होणार असल्याने या भागाची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. देशातील सात टेक्सटाईल पार्कपैकी एक विदर्भात मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी टेक्सटाईल पार्क अमरावती येथे दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यामुळे देशाचा जीडीपी वाढविण्यासाठी राज्याच्या वाटा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्थानिकांना येथे अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथील अर्थकारणास वेग येणार आहे. याठिकाणी नविन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टेक्सटाईल पार्क मंजूर होणे ही महत्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे विकासाच्या वाटा निर्माण होतील. टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.