चांदूर रेल्वे – (ता. प्रतिनिधी)
चांदूर रेल्वे ते नांदगाव खंडेश्वर या महत्त्वाच्या मार्गाची दुरवस्था दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. “रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?” असा संभ्रम निर्माण करणाऱ्या या मार्गाने आता नागरिकांचा संयम संपुष्टात आणला आहे.
या रस्त्यावरून दिवसेंदिवस हजारो दुचाकी, चारचाकी आणि मालवाहू वाहने धावतात. परंतु रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, तर काही ठिकाणी पाईप बसवण्यासाठी खणलेल्या जागी उंचवटे तयार झाल्याने वाहनचालकांची अक्षरशः सर्कस सुरू आहे.
धुळीमुळे दुचाकीस्वारांचे डोळे मोठे त्रासले जात आहेत. वाहनांचे ब्रेक, सस्पेन्शन, टायरही जास्त प्रमाणात खराब होत असल्याने नागरिकांच्या खिशावरही मोठा आर्थिक बोजा पडत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे पाईप टाकण्यासाठी रस्ता उकरला, पण नंतर मुरुम टाकून काम उडवले. जेथे पाईप पाडले तेथेच डोंगराएवढे उंचवटे तयार झाले. मोठी वाहने गेल्यानंतर उडणारी धूळ तर इतकी की समोरचे वाहन दिसेनासे. या उंचवट्यांवरून जाणे म्हणजे गाडीची कसरत आणि चालकाची परीक्षा! कुऱ्हा – चांदूर रेल्वे – नांदगाव खंडेश्वर हा रस्ता नव्याने बनणार असल्याची माहिती मिळाली असली तरी त्याची निश्चित वेळमर्यादा मात्र शून्य. “नवीन रस्ता होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत आम्ही खड्ड्यांतूनच प्रवास करायचा का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नवीन रस्त्याचा प्रकल्प हा दीर्घकालीन असला तरी, किमान तात्पुरती डांबरीकरण-डागडूजी करावी, जेणेकरून नागरिकांना हा त्रास सहन करावा लागू नये, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ, लहान व्यापारी आणि नियमित प्रवासी यांनी केली आहे.
रस्त्याची दुरुस्ती करावी ..!
मी चांदूर रेल्वे ते नांदगाव खंडेश्वर या रस्त्याने कामानिमित्य दररोज येणे – जाणे करतो. या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब असून जागोजागी खड्डे पडले आहे. यामुळे अनेक अपघात सुद्धा होत आहे. तसेच अनेकांना मणक्याचे, पाठीचे आजार खड्ड्यांमुळे होत आहे. तरी प्रशासनाने नवीन रस्ता होईपर्यंत सध्या तात्पुरती दुरुस्ती तरी करावी.
निलेश देऊळकर
नागरिक, चांदूर रेल्वे
















