प्रतिनिधी : धामणगांव रेल्वे
अमरावती : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ-ब-क-ड) तात्काळ लागू करावे तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई ते नागपूर अशी भव्य पायी पदयात्रा निघाली असून लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा धामणगाव रेल्वे येथे दाखल झाली.
संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी, शहरोगावी मातंग समाज मोठ्या उत्साहाने या पदयात्रेचे स्वागत करीत आहे. धामणगाव रेल्वे शहरातही समाज बांधवांनी ढोल-ताशांच्या गजरात, जल्लोषात आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पदयात्रींचे स्वागत करून दृढ पाठिंबा दर्शविला. समाजातील सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होत आहेत.
गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मातंग समाजावर अन्याय होत असल्याचे विष्णुभाऊ कसबे यांनी सांगितले. “आजपर्यंत या समाजातून एकही आयएएस अधिकारी निर्माण झाला नाही. राजकीय क्षेत्रातही संधी दिल्या जात नाहीत. समाज मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर आरक्षणाची वर्गवारी आवश्यक आहे. आमचा हक्क आम्हाला स्वतंत्र आरक्षणातूनच मिळू शकतो, याच मागणीसाठी आमची ही लांब पायी पदयात्रा आहे,” असे ते म्हणाले.

मुंबईपासून नागपूरकडे निघालेली ही पदयात्रा १४ जिल्ह्यांतून, अनेक गावां-शहरांतून मार्गक्रमण करत आहे. येत्या १२ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर हजारो समाजबांधवांसह धडक देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
धामणगाव रेल्वे येथील कार्यक्रमानंतर पुढील दिवशी आर्वी मार्गे नागपूरकडे प्रस्थान करणार आहे. समाजाच्या हक्कांसाठी ही पदयात्रा राज्यात मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळवत असल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे. तरी सर्व समाज बांधवांनी येत्या 12 तारखेला नागपूर यशवंत स्टेडियम येथे हजर राहण्याचे आवाहन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांनी केले आहे.
प्रतिनिधी आयुष वाघमारे धामणगाव रेल्वे












