नवरात्रोत्सवात ३०१ अखंड ज्योती व भव्य धार्मिक आयोजन…
दररोज कन्या भोजन, सप्तमीस कुमकुम अभिषेक तर नवमीस महाप्रसाद...
धामणगाव रेल्वे,
प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सवात शहराच्या मध्यवर्ती भागातील प्राचीन माताजी देवस्थान भक्तांनी फुलून गेले आहे. श्रद्धा आणि आस्थेचा असा उधाण आलेला की भक्तांनी कोणतीही कसर ठेवलेली नाही.
अश्विन आणि चैत्र नवरात्रांमध्ये येथे विविध धार्मिक अनुष्ठानं होतात. भक्तांच्या मनोकामना पूर्णीसाठी ३०१ अखंड ज्योती नवमीपर्यंत प्रज्वलित ठेवण्यात येतात. सप्तमीला माताजींचा अनुपम कुमकुम अभिषेक केला जातो. त्यानंतर देवीचं स्वरूप अत्यंत मनमोहक दिसतं. शेकडो भक्त या प्रसंगाचा लाभ घेतात.
नऊ दिवसांची प्रभात मंगल आरती भक्तांना नवचैतन्याचा अनुभव देते. या काळात आसपासच्या ग्रामीण भागातून व शहरातून शेकडो महिला अनवाणी पायांनी माता चरणी माथा टेकवायला येतात. सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळची आरती संगीत व उल्लासाच्या वातावरणात पार पडते.
नवरात्रोत्सवात दररोज कन्या भोजन, अष्टमीला होमहवन व बुधवार १ ऑक्टोबर रोजी नवमीस महाप्रसादाचे आयोजन ठेवण्यात आले आहे.
मंदिर परिसराचे वातावरण भक्तिभाव व श्रद्धेने ओथंबून गेलेले असते. येथे देवाधिदेव महादेव मंदिर, शीतला माता मंदिर व भैरव बाबा मंदिरही आहेत. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात त्रिशूलासह मां भगवतीची मनमोहक प्रतिमा विराजमान आहे. याशिवाय एका बाजूस वैष्णव माताची पिंडी व दुसऱ्या बाजूस शंकरजींची पिंड स्थापित आहे. दररोज माताजींच्या मूर्तीचा विशेष शृंगार भक्तांच्या आस्थेला अधिक दृढ करतो.
या धार्मिक अनुष्ठानाच्या यशस्वीतेसाठी पुजारी पप्पू महाराज शर्मा यांच्यासह शेकडो भक्त सक्रिय भूमिका बजावत आहेत.