अमरावती, दि. 7 : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली कारागृह अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक सभा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कारागृहाचे आतील परिसर व बरॅकची पाहणी केली. तसेच सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याच्या सूचना केल्या.
सदर सभेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे, कार्यकारी अभियंता श्री. गिरी, तसेच कारागृहाच्या अधीक्षक किर्ती चिंतामणी, उपअधीक्षक प्रदिप इंगळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, अंतर्गत सुरक्षा अधिकारी, मंडल तुरुंगाधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी कारागृहातील पाकगृह, कारखाना, मुर्तीकाम, शिवणकाम, सुतारकाम, लॉन्ड्री, पॅथोलॉजी, ई-सेल, मुलाखत कक्ष, धान्य गोदाम, उपहारगृह, ग्रंथालय, रेडिओ कक्ष, ई-लायब्ररी, मुक्त विद्यापीठाचे कारागृहातील अभ्यास केंद्र, व्हिडिओ कॉन्फरन्सींग कक्ष, दवाखाना, महिला विभाग, अति सुरक्षा विभागास भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. तसेच जिल्हा नियोजनच्या निधी अंतर्गत सुरु असलेल्या बांधकामाचा आढावा घेतला. कारागृहाच्या सुरक्षा कारणास्तव कार्यालयास ई-बाईक, जनरेटर खरेदी, सोलर यंत्रणा, प्रस्ताव सादर केल्यास जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात येईल असे सांगितले आहे.
भेटी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी कारागृहाचे पाकगृह आधुनिकीकरण आणि नवीन गॅस पाईप लाईनसाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून निधी देण्याचे येणार असल्याचे सांगितले. तसेच जनरेटर दुरुस्ती करण्याबाबत व सीसीटीव्ही यंत्रणा सुरक्षेच्या कारणास्तव जनरेटरशी जोडणी करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागास आदेश दिले. सांस्कृतिक हॉलसाठी प्रोजेक्टरसारख्या अत्याधुनिक सुविधेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. यासोबतच पोलिस विभागास पुरेसा पोलिस पथक पुरविण्याबाबत आदेश दिले.