जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी
अमरावती, दि. 4 (जिमाका) : जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.
स्वातंत्र्य सैनिकांसाठी आरोग्य तपासणी आणि संवाद मेळावा येत्या मंगळवारी
अमरावती, दि. 4 (जिमाका): स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाला सलाम करण्यासाठी, सामान्य प्रशासन विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येत्या मंगळवारी, 8 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी आणि आणीबाणी मानधनधारकांसाठी विशेष आरोग्य तपासणी आणि संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाने जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखड्याचा हा एक भाग आहे. या मेळाव्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची तपासणी केली जाईल, तसेच त्यांच्या समस्या आणि अडचणींवर चर्चा करून योग्य मार्गदर्शन आणि त्याचे निराकरण केले जाईल.
स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि त्याग देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अमूल्य ठरला आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी आणि आणीबाणी मानधनधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.
समता पंधरवडानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम; ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 4 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि. 1 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत समता पंधरवडा राबविला जात आहे. यानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. समता पंधरवडा कालावधीत इयत्ता इ. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सन 2025-26 मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सीईटीमार्फत व्यावसायिक अभ्याक्रमात प्रवेश घेणाऱ्या तसेच डिप्लोमा तृतीय वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी समता पंधरवडा शिबिराचा लाभ घेऊन परिपूर्ण ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत यांनी केले आहे.