अमरावती, दि. 3 : देशातील विविधता, सामाजिक समृद्धी आणि एकात्मता टिकून राहण्यासाठी संस्कृतीचे जतन होणे आवश्यक आहे. आदिवासी समाजातील सांस्कृतिक वारसा, भाषा, कला आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी भर देणार. आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय भवन येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचा आढावा डॉ. उईके यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार किरण सरनाईक, आमदार केवलराम काळे, आमदार प्रविण तायडे, आमदार उमेश यावलकर, आमदार राजेश वानखडे, आमदार गजानन लेवटे, प्रविण पोटे-पाटील, एमआयडीसीचे किरण पातुरकर, आदिवासी विकास अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, धारणी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्री. उईके म्हणाले, आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि उत्कर्षासाठी शासन विविध योजना राबवित आहे. आदिवासींचे प्रश्न समजून घेण्यासाठी लवकर मेळघाटचा दौरा करण्यात येईल. त्यानुसार तेथील प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. नवसारी वसतिगृहाजवळील कचरा काढून ती जागा त्वरित स्वच्छ करण्यात यावी. डीबीटी वेळेवर देण्यात येईल. सर्व पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल. स्थानिकांची गरज लक्षात घेऊन आदिवासी बांधवांच्या हाताला काम देण्यात येईल. वन हक्क जमीन पट्ट्यांपासून आदिवासी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शासकीय वसतिगृह, आश्रम शाळांमध्ये सर्व आवश्यक सोयी -सुविधा निर्माण करण्यात येईल. प्रत्येक आदिवासी महिलेला सन्मानपूर्वक वागणूक दिल्या जाईल. आदिवासींच्या समस्या सोडविण्यावर भर देणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .
यावेळीसामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिंनी, नागरिक यांच्याशी डॉ. उईके यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर त्वरित उपाययोजना आखण्यासाठी संबंधितांना सूचित केले.
डॉ. उईके यांनी सकाळी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेतील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजाननराव पुंडकर, ॲड. जे.व्ही.पाटील पुसदेकर आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे साधला संवाद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक
अमरावती, दि. 3 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी उमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली.
याबैठकीस उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्हानिहाय सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांचा दुरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला तसेच जिल्ह्यातील विविध विकास योजनावरही याबैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्ह्याच्या पालकसचिव श्रीमती आय ए कुंदन या दुरदृष्यप्रणालीद्वारे तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार सुलभा खोडके, आमदार उमेश ऊर्फ चंदू यावलकर, आमदार प्रविण तायडे, आमदार गजानन लेवटे, आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, मनापा आयुक्त सचिन कलंत्रे, उपायुक्त नियोजन कावेरी नाखले, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के आदी उपस्थित होते.
यावेळी पुढील वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थसंकल्पावर बैठकीत चर्चा झाली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 417.78 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 102 कोटी रुपये, तर आदिवासी उपयोजना घटक कार्यक्रमासाठी 117.38 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सर्व कामे वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले. सुरु कामे विहित वेळेत पूर्ण करण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. यामध्ये मेळघाटातील आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘मिशन 28’ उपक्रम, चिखलदरा येथील साहसी खेळ प्रकार, वन पर्यटन विकास आदींबाबत यावेळी माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सहासी खेळ प्रकारात सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबाबत यंत्रणेला निर्देश दिले.
00000