अमरावती, दि. 23 (जिमाका): राज्य शासनाच्या वतीने सन 2023-24 साठी जिल्हा पुरस्कारासाठी जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच जिल्ह्यातील खेळाडूंचा गौरव व्हावा व क्रीडा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2025 रोजी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती यांचे प्रांगणात उद्योग राज्य मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी दहा हजार रूपये, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रा. डॉ. योगेश सुरेशराव निर्मळ (जलतरण)यांना देण्यात येईल. डॉ. योगेश निर्मळ यांनी जलतरण या खेळाचे खेळाडू जिल्हास्तर ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घडविले. यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नॅशनल गेम्स, सिनिअर व ज्युनिअर राष्ट्रीय व राज्यस्तरीय अजिंक्यपद स्तरावर खेळाडूंना मार्गदर्शन केले.
थेट पुरस्कारार्थी- हिमांशु प्रविण जैन (जिमनॅस्टीक) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. हिमांशु जैन यांनी जिमनॅस्टीक या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 2023 रोजी ताश्कंत (उजबेगीस्तान) येथे झालेल्या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करुन व्दितीय क्रमांक प्राप्त केला. हिमांशु यांनी अनेक राज्यस्तर ते राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त केली आहेत.
गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरुष सौरभ संतोष टोकसे (सॉफ्टबॉल) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. सौरभ टोकसे यांनी शालेय, राष्ट्रीयस्तर क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर वरिष्ठ गटातील क्रीडा स्पर्धा गुजरात, संभाजी नगर, आंध्र प्रदेश, ओडीसा, श्रीनगर तसेच विविध राज्यस्तर स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केले आहे. गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला वैष्णवी देविदास बांडाबुचे (वुशु) यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. वैष्णवी यांनी वुशु या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर वरिष्ठ, कनिष्ठ गट स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगीरी करुन प्राविण्य प्राप्त केले आहे.
जिल्हा गुणवंत क्रीडा विशेष पुरस्कार- प्रविण दादाराव आखरे, पोलीस हवालदार (योगासन) यांना देण्यात येणार आहे. श्री. आखरे पोलीस दलात कार्यरत असून योगासन या प्रकारात इंडिया व एशिया बुकमध्ये यांचा साहसी उपक्रम नोंदविला आहे.