नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ओंकारखेडा येथील समुदाय अधिकार केंद्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील सुमारे ३० महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे आणि डॉ. सोयब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी महिलांशी संवाद साधत महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरणाच्या गरजेवर आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समुदाय अधिकार केंद्राची माहिती देण्यात आली. आतापर्यंत केंद्रात किती सभासद (भागधारक) झाले आहेत, तसेच या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत कोणकोणते उपक्रम राबविण्यात आले आहेत, याची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली.
या वेळी मंचावर रंजना वानखडे, काजल पवार, मालिका पवार आणि सुनंदा भोसले या उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या बोलीभाषेतून महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अनुभव ऐकून घेतले. तसेच पुढे समुदाय अधिकार केंद्राच्या माध्यमातून महिलांसाठी कोणत्या प्रकारचे काम करता येईल, यावरही महिलांनी चर्चा करून काही दिशा ठरवल्या.
महिला दिनानिमित्त महिलांनी गीते आणि सांस्कृतिक सादरीकरणही केले. “तू कमजोर नाहीस” ही प्रेरणादायी कविता जया पवार यांनी सादर केली, ज्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल पवार यांनी केले. या कार्यक्रमासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाच्या तयारीत शिवा पवार, मालिका पवार आणि अंजू पवार यांनी विशेष मेहनत घेतली.
विशेष बाब म्हणजे हा महिलांचा कार्यक्रम असल्याने महिलांनीच पुढे येऊन आपले विचार मांडावेत, यासाठी आयोजक टीममधील सदस्यांनी मंचावर न जाता महिलांना बोलण्यासाठी संधी दिली. महिलांनीही मनमोकळेपणाने आपले प्रश्न आणि मते व्यक्त केली.
या वेळी इकोनेटच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देखील महिलांना देण्यात आली. तसेच लवकरच आयोजित होणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. या जनसंवादात मातृत्ववंदन योजना आणि जननी सुरक्षा व महिलांच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर चर्चा होणार असून, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी महिलांना आवाहन करण्यात आले.
समुदाय अधिकार केंद्राच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम राबवून फासे पारधी समुदायातील महिलांना एकत्र आणणे, त्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि पुढील कामाची दिशा ठरवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
















